नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्रामच्या जागेतील प्रस्तावित १,८२५ वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींचा संघर्ष सुरू असताना, मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीसाठी तब्बल १,२७० झाडे तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानेच या वृक्षतोडीची कबुली दिली आहे. या वृक्षतोडीच्या बदल्यात सातपूर येथील फाशीच्या डोंगर परिसरात १७ हजार ६८० झाडांची लागवड केल्याचा दावा वृक्ष प्राधिकरण विभागाने केला आहे.
तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी १,८२५ झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी नाशिककरांच्या या लढ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह सत्तारूढ शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटानेही सहभाग घेत भाजपला एकाकी पाडले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि अंजली दमानिया यांनीदेखील या आंदोलनात उडी घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, तपोवनात मलनिस्सारण केंद्राच्या बांधकामासाठीच्या वृक्षतोडीचा मुद्दा समोर आला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ केली जात आहे.
मलनिस्सारण केंद्रांच्या बांधकामात अडथळा ठरणारी पंचक मलनिस्सारण केंद्रासाठी ६५०, चेहेेडी मलनिस्सारण केंद्रासाठी ३६१, आगरटाकळी मलनिस्सारण केंद्रासाठी १८९, तर तपोवन मलनिस्सारण केंद्रासाठी ५२८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव मलनिस्सारण विभागाने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मांडला होता. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळपाहणी करत प्रत्यक्षात मलनिस्सारण केंद्र बांधकामात अडथळा ठरत असलेली झाडे तोडण्यात आली. चारही मलनिस्सारण केंद्रांच्या ठिकाणी ४५८ वृक्ष तोडीपासून वाचविण्यात आले. वृक्ष तोडण्यापूर्वी मलनिस्सारण विभागाने एक कोटी ७६ लाख ८० हजार रुपये सुरक्षा रक्कम अनामत म्हणून भरल्याचे वृक्ष प्राधिकरण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.