Kumbh Mela logo unveiling reflecting Simhastha tradition
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयूष पिंपळनेरकर यांना एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बस्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे या तज्ज्ञांच्या समितीने प्रवेशिकांचे परीक्षण केले.
सर्जनशीलता, नावीन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली. यावेळी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, महंत उपस्थित होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, मायगव्ह आणि असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली.
२० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्या खालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. १८ ते २४ वयोगटांतील तरुणांनी स्पर्धेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरुपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला आहे.
बोधचिन्हाचे वैशिष्ट्ये
नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भौगोलिक-धार्मिक परंपरांवर आधारित
भगवान शंकराचे त्रिशूळ: आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक
त्र्यंबकेश्वर मंदिरः प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती
काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदीः गोदावरी नदीला शिवलिंगाच्या रूपात दर्शविण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते
नवीन वीज उपकेंद्र उभारणार, महासभेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर
नाशिक : दरम्यान आगामी सिंहस्थ कुंभमेळा अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नवीन ३३/११ केव्ही गोदा पार्क जीआयएस विद्युत उपकेंद्रासाठी ६०० चौ. मी. जागा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव नाशिक महापालिकेच्या येत्या महासभेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने नाशिक शहर - १ सर्व्हे नं. ११ येथील जागेची मागणी केली असून, प्रस्तावित उपकेंद्रावर रविवार कारंजा आणि अशोकस्तंभ परिसरातील अतिभारित वीजवाहिन्यांचा भार वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे सिंहस्थ काळात शहराला अखंडित वीजपुरवठा करण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नगरनियोजन विभागाने संबंधित जागा ओपन स्पेस क्षेत्रात येत असली तरी नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमांनुसार इलेक्ट्रिक सबस्टेशनसाठी वापर अनुज्ञेय असल्याचा अभिप्राय दिला आहे. मात्र, यासाठी संबंधित भूखंडधारकांची संमती आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत हरकती मागविण्यात आल्या होत्या. मात्र, मुदतीत कोणतीही हरकत प्राप्त झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचवटी यांनी ६०० चौ.मी. जागेचे बाजारमूल्य ९२ लाख ४० हजार रुपये निश्चित केले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ७९ अन्वये ही जागा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव असून, भाडे आणि सुरक्षाठेव निर्धारण समितीच्या मंजुरीनंतर बाजार भावानुसार भाडे निश्चित केले जाणार आहे. महासभेची मंजुरी आणि शासन मान्यता मिळाल्यानंतर ही जागा महावितरणला ३० वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, त्यासाठी आगाऊ ताबा देण्यासही मंजुरी मागण्यात आली आहे.