

Namkaran aware Ashok Kharat Case
नाशिक : सिन्नर येथील पतसंस्थेतील आर्थिक व्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नामकर्ण आवारेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पतसंस्थेमधील व्यवहारातील 2 टक्के रक्कम आवारेला मिळायची, असा दावा पोलिसांनी कोर्टासमोर केला आहे.
अशोक खरातचा निकटवर्तीय नामकर्ण आवारेला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. आवारे उद्योजक असून श्री जगदंबा बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील बनावट 32 खात्यांच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी आवारेला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती एल. सी. वाडीकर यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.
हा ट्रॅपच- आवारेच्या वकिलांचा दावा
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी अटकेच्या कारवाईवर आक्षेप घेत आरोपीचे वय 65 वर्षे असून त्याच्यावर दोन वेळा अँजिओप्लास्टी झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 26 एप्रिल रोजी सर्व संचालकांना नोटीस देण्यात आली होती आणि आवारेने वेळेत पोलिसांशी संपर्क साधून जबाबही नोंदविला होता, असे वकिलांनी सांगितले.
खरातने आवारे कुटुंबाच्या नावाने समता बँकेत खोट्या FD केल्या आहेत. पोलिसांनी साक्षीदार म्हणून नोटीस दिली आणि नंतर आरोपी म्हणून अटक केल्याने हा ट्रॅप वाटत आहे, असंही वकिलांनी कोर्टात सांगितले.
एफडीच्या रकमा २०२३ मध्ये खरातने काढल्याचा उल्लेख करत केवळ कोठडीत असलेल्या व्यक्तीने नाव घेतल्यामुळे अटक करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचा युक्तिवादही आवारेच्यावतीने करण्यात आला.
यावर तपासी अधिकाऱ्यांनी खरातच्या जबाबात आवारेचे नाव समोर आल्याचे सांगितले. संबंधित पतसंस्थेचा चेअरमन म्हणून आवारे कार्यरत होता आणि खात्यांमधून पैसे काढताना दोन टक्के रक्कम त्याला मिळत असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला. एकूण 32 खात्यांचा तपास करायचा असून आणखी खाते उघडण्यात आले आहेत का, याचीही चौकशी आवश्यक असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नामकर्ण आवारेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.