नाशिक

Nashik news: धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्यांनीच टाकला खडसेंच्या घरावर दरोडा

Eknath Khadse House Robbery : ७ लाखांचे दागिने लंपास; मुंबईतील ३ संशयित आरोपींची ओळख पटली

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: एकेकाळचे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरावर तीन दिवसांपूर्वी टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.

धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईतून आलेल्या तीन तरुणांनीच खडसेंच्या घरावर हात साफ केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात सुमारे ७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी पळवली होती.

धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली दरोडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील तीनही संशयित आरोपी मुंबईतील उल्हासनगर येथील रहिवासी आहेत. हे आरोपी जळगाव येथील सुप्रीम कॉलनी परिसरातील त्यांच्या नातेवाईकांकडे 'नियाज' (Nyaz) या धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. धार्मिक कार्यक्रमासाठी जळगावमध्ये आल्यानंतर रात्रीच्या वेळी या तरुणांनी खडसे यांच्या शिवराम नगर येथील घराला लक्ष्य केले. यापूर्वी याच टोळीने परिसरातील चार इतर घरांवरही दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, मात्र तेथे त्यांना यश आले नाही.

खडसेंच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी शिवराम नगरमधील खडसेंच्या घरावर डल्ला मारत सुमारे ७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २०२२ नंतरची काही महत्त्वाची कागदपत्रे एका बॅगमध्ये भरून पळ काढला होता. या गुन्ह्यानंतर जळगाव पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना निष्पन्न केले.

गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त

दरोड्याच्या घटनेत वापरलेली सुझुकी (Suzuki) कंपनीची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर, त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने पथके मुंबईतील उल्हासनगरकडे रवाना केली आहेत. पथकात दोन स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, दोन स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि तपास अधिकारी यांचा समावेश असलेले पथक आरोपींना पकडण्यासाठी रवाना झाले आहे.

आरोपींवर इतर राज्यांतही गुन्हे दाखल?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संशयित आरोपींवर महाराष्ट्रासह इतर तीन राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे. या टोळीच्या आंतरराज्यीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास पोलीस करत आहेत. या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या गुन्ह्यांची तपासणी सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे. राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याच्या घरावर झालेले दरोड्याचे हे प्रकरण आणि धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्यांनीच गुन्हेगारी कृत्य केल्याने जळगावात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT