

One and a half thousand farmers will cultivate mulberry in the district
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात एक हजार ५२१ शेतकऱ्यांची तुती लागवडीसाठी निवड करण्यात आली आहे. ८५६ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी जिल्ह्यात ३९४ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड पूर्ण झाली असून, ११२ रोपवाटिका तयार करण्यात आल्या. ९५ शेतकऱ्यांनी संगोपन ग्रहाचे बांधकाम पूर्ण केले आहे. जिल्ह्यात ९७ शेतकऱ्यांनी आजपर्यंत एक कोटी ३७ लाख रुपयांचे या योजनेखाली उत्पन्न घेतल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
कृषी विभागातर्फे सावळघाट (ता. पेठ) येथील शेतकऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा झाली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत निवडलेले लाभार्थी यावेळी उपस्थित होते. आदिवासी बहुल तालुक्यांसह विशेषतः महिला शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगावर भर दिल्यास कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळेल. शासनाच्या 'लखपती दीदी' उपक्रमातून शेतकऱ्यांना आर्थिक उप्तन्नाचा मार्ग उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी दिली.
कृषी विस्तार अधिकारी जयवंत गारे यांनी प्रास्ताविक केले. कृषी अधिकारी संतोष राठोड यांनी रेशीम लागवड व कृषी विभागाच्या विविध योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनांविषयी माहिती दिली. कृषी अधिकारी तथा नोडल अधिकारी विजयकुमार धात्रक यांनी तुती लागवड ते अंडे, कोश लागवड यामध्ये संगोपन ग्रह उभारणी कशी करावी, याविषयी माहिती दिली. रोजगार हमी कक्षप्रमुख ओंकार जाधव यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. मिलिंद भोये (आड बुद्रुक), एकनाथ मोरे (करंजखेड) यांनी आपल्या रेशीम शेतीबाबत अनुभव सांगितले.
कार्यशाळेसाठी सावळघाटचे सरपंच मनोज भोये व रेशीम लागवड शेतकरी तुळशीदास भोये यांनी बचतगट कसे सहकार्य करेल याची माहिती दिली. या योजनेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी सुनील बागूल यांच्या मार्गदर्शन मिळाले. यावेळी संतोष राठोड, सचिन जाधव, तुळशीदास भोये यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.