पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
कपालेश्वर महादेव मंदिरातील विश्वस्त, गुरव, पुजारी यांच्यातील वाद संपता संपत नसून मंदिरात एक व्यक्ती ट्रस्ट दानपेटीवर असलेले पैसे गुरवांच्या दानपेटीत टाकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जुना असून, तो आता व्हायरल झाला आहे. (Kapaleshwar Temple Nashik)
कपालेश्वर महादेव मंदिराचे नवनियुक्त विश्वस्त असो वा तत्कालीन प्रशासक त्यांचे गुरव, पुजारी यांच्यासोबत नियमित वाद होत असल्याचे सर्वश्रुत आहे. विश्वस्तांकडून गुरव, पुजारी, ब्राह्मण आणि स्थानिकांना विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच मुख्य गुरव पुजारी हेमंत गाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यानंतर आता आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ हा सन २०१९ चा असल्याचे त्याच्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे एवढा जुना व्हिडिओ आता कसा समोर आला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेचे कंट्रोल ट्रस्ट कार्यालयात आहे. त्यामुळे यामागे कोण? याबाबत चर्चा रंगली आहे. दरम्यान, श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या विश्वस्त आणि गुरव पुजारी यांच्यातील वादामुळे भाविकांमध्ये कपालेश्वर मंदिराची बदनामी होऊन भाविकांत चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे विश्वस्त आणि गुरव यांनी एकत्र बसून हे आपापसातील वाद मिटवावे, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे. (Kapaleshwar Temple Nashik)
काही दिवसांपूर्वी तत्कालीन प्रशासकांच्या कामाबद्दल व विश्वस्त विश्वासात घेत नसल्याबाबत पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित केले होते. त्याचाच मनात कुठेतरी राग धरून वैयक्तिक गुन्ह्यात अडकवण्यासाठी हा प्रयत्न आहे. आपापसातील वादात बाहेरच्या व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये. आम्ही एकत्र येऊन वाद मिटवू शकतो.
हेमंत गाडे (मुख्य पुजारी, कपालेश्वर महादेव मंदिर)
सध्या बाहेर असल्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ बघितलेला नाही. नाशिकला आल्यावर व्हिडिओ बघून नक्की काय प्रकार आहे, याची माहिती घेऊन विश्वस्तांसोबत बैठक घेत याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
मंडलेश्वर काळे, (अध्यक्ष, श्री कपालेश्वर महादेव मंदिर)
हेही वाचा :