नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामदैवत कालिकामाता मंदिराच्या नवरात्र यात्रा उत्सवासाठी महापालिकेच्या भूखंडावर रहाटपाळणा व मनोरंजनाची साधने उभारण्यासाठी घेण्यात आलेल्या जाहीर लिलाव प्रक्रियेवर सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी आक्षेप घेतला आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या वेळेनुसार उपस्थित राहूनही इच्छुक मक्तेदारांना लिलावात सहभागी होता आले नसल्याचा आरोप त्यांनी केला असून, हा लिलाव रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेरलिलाव घेण्याची मागणी केली आहे.
महापालिकेने गुरुवारी (दि. २४) प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार मुंबई नाका येथील हॉटेल संदीपसमोरील भूखंड क्रमांक १०८/अ वरील खुली जागा दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणार होती. यासाठी सोमवारी (दि. २८) सकाळी १०.३० वाजता पश्चिम विभागीय कार्यालयात जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता.
सहभागी होण्यासाठी दोन लाख रुपये अनामत रक्कम, रहिवासाचा पुरावा, ओळखपत्र व जीएसटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. जाहिरातीवर विश्वास ठेवून अनेक इच्छुक सकाळी ९ ते १० वाजताच कार्यालयात दाखल झाले होते. मात्र, १०.३० वाजल्यानंतरही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
काही इच्छुक दुपारी १ पर्यंत थांबले होते. चौकशी केली असता लिलाव ११ नंतर होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर कार्यालयीन अधीक्षकांमार्फत संबंधित लिपिकाशी संपर्क साधला असता लिलाव प्रक्रिया आधीच पूर्ण झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
मागील वर्षी हा ठेका सुमारे १९ ते २० लाख रुपयांना गेला होता. यंदा ३० ते ३५ लाख रुपयांपर्यंत बोली जाण्याची अपेक्षा असताना केवळ १४ ते १५ लाख रुपयांपर्यंत ठेका गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहभागी मक्तेदारांची संख्या, बोली नोंदवही, अंतिम रक्कम व संपूर्ण प्रक्रिया तपासण्याची मागणी डोके यांनी केली आहे.
उपोषणाचा इशारा:
लिलाव रद्द करून स्वतंत्र चौकशी, सर्व इच्छुकांना समान संधी देत फेरलिलाव आणि संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशाराही डोके यांनी दिला आहे.
देवळाली कॅम्प :
येथील बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी एनएसएसप्रमुख प्रा. डॉ. भास्कर नरवटे, प्रा. सुनीता बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जेल रोडच्या दसक नदी घाटावर गणेशविसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलन केले, तसेच ४३० गणेशमूर्ती संकलित केल्या.