पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा नाशिक प्रेस क्लब, शहर पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या वतीने निषेध करण्यात आला (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Journalist Attack Case : पत्रकार संरक्षण कायदा गांभीर्याने अमलात आणा

पत्रकार संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा नाशिक प्रेस क्लब, शहर पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या वतीने निषेध करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देत राज्य शासनाचा महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा गांभीर्याने अमलात आणावा. पत्रकारांना मारहाण प्रकरणी संबंधित कंत्राटदार व मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत उचित कार्यवाही करून लवकरच पत्रकारांच्या निवेदनातील मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले.

त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ कमानीजवळ पार्किंगची अवैध वसुली करणाऱ्यांकडून पुढारी न्युजचे किरण ताजणे व माध्यम प्रतिनिधी योगेश खरे, अभिजीत सोनवणे यांना मारहाण झाली होती. या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना वारंवार त्र्यंबकला जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या वाहनांसाठी सवलत द्यावी. यासंदर्भात पोलिस विभाग व यंत्रणेला सुचित करावे. त्र्यंबकमध्ये भाविकांकडून होणाऱ्या अवैध वसुली प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. नगरपालिकेकडून पार्किंग कर वसुलीसाठी फास्टट्रॅग डिजिटल प्रणाली कार्यान्वित करावी. प्रवेशकर वसूल करणारे कर्मचारी आणि त्यांचे कंत्राटदार सर्वच संशयास्पद असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे होत असून त्यातून गुन्हेगारांना पोसण्याचे काम होत असल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार महामार्गावरील टोल नाक्यांवर देखील होतो. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी नेमल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी पोलिस, महसूल विभागाने करावी. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडून घेतला जाणारा प्रवेश कर आणि पार्किंगची वसुली पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

यावेळी दैनिक पुढारीचे निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, शैलेंद्र तनपुरे, जयप्रकाश पवार, अभिजीत कुलकर्णी, अभय सुपेकर, दीप्ती राऊत, संपत थेटे, किरण लोखंडे, चंदन पूजाधिकारी व संपत देवगिरे उपस्थित होते.

नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना उबाठा सेनेचे पदाधिकारी.

पत्रकारांवरील हल्ल्याचा 'उबाठा'कडून निषेध

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध आणि कुंभमेळ्याच्या नियोजनातील गंभीर प्रश्नांसंदर्भात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला होणे म्हणजेच संपूर्ण लोकशाहीवर आघात आहे. कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक सोहळ्यापूर्वी अशी घटना घडली, हे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. पत्रकार साधू संतांच्या भूमिकेबाबत माहिती घेण्यासाठी गेले होते; मात्र, त्यांच्यावर हल्ला होणे संशयास्पद आहे. प्रशासन साधू संतांच्या भूमिकांवर दबाव आणत असल्याचे दिसते. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती अद्याप झालेली नसल्याचे खेदजनक बाब मानले आहे.

शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, खासदार राजभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर कोकणे, सचिव मसूद जीलानी, विद्यार्थी सेना संघटक वैभव ठाकरे, तसेच अनेक महानगर व तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांवरील हल्ल्याबाबत गंभीर लक्ष देऊन प्रशासनाकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT