

नाशिक : 'पुढारी न्यूज' वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्यासह पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करीत बेदम मारहाण प्रकरणी आता त्र्यंबक नगरपरिषद ॲक्शन मोडवर आली आहे. वाहन शुल्क वसुलीचे कंत्राट दिलेल्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावताना, ४८ तासांत खुलासा करावा अन्यथा कंत्राट रद्द केले जाईल, असा थेट अल्टीमेटमच दिला आहे. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत.
शनिवारी (दि. २०) त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर आयोजित साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या किरण ताजणे यांच्यासह पत्रकारांवर स्थानिक कराच्या नावाखाली पार्किंग माफीयांनी हल्ला केला होता. यात ताजणे गंभीर जखमी झाले. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत, संबंधित पार्किंग माफियाचा ठेका त्वरीत रद्द करण्याबराेबरच माफियांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर, रविवारी (दि. २१) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबक नगरपरिषदेला आदेश देत संबंधित पार्किंग माफीयावर कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार, त्र्यंबक नगरपरिषदेने ठेकेदाराला कडक शब्दांत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ४८ तासांच्या आत याबाबत सविस्तर खुलासा करावा, अन्यथा कंत्राट रद्द करण्यात येईल, असा अल्टीमेट त्र्यंंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी नोटीसद्वारे दिला आहे.
या पार्किंग माफीयाकडून नगरपरिषदेसोबतच्या करारातील अनेक नियमांचा भंग करीत स्थानिक कराच्या नावे त्र्यंबकमध्ये येणाऱ्या भाविकांसह सर्वसामान्यांकडून बेसुमार वसुली केली जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कुठल्याही प्रकारचे दरपत्रक न लावता या माफियाच्या गुंडांकडून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना धमकावून त्यांची लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारच्या गुंडांना मोकळीक दिल्यास, नाशिकची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी जनभावना व्यक्त होत आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, वाहन प्रवेश शुल्क वसुलीचे काम 'ए. एस. मल्टी सर्व्हिसेस, खारघर, नवी मुंबई' या कंपनीकडे देण्यात आले आहे. एकूण एक कोटी आठ लाख रुपयांचा वार्षिक ठेका असून, संबंधित कंपनीकडे शहरातील सफाई, पाणीपुरवठा आणि पार्किंग वसुलीचे काम आहे. ठेकेदार अनिल शुक्ला यांच्याकडे हे कंत्राट असून, त्याने दोन स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत वसुलीचे काम सुरू ठेवले आहे. या अधिकाऱ्यांनी काही बाहेरच्या तरुणांना वसुलीसाठी नेमले आहेत.