

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा बैठकीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या 'पुढारी न्यूज'चे प्रतिनिधी किरण ताजणे यांना मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी (दि. २०) स्वामी समर्थ कमानीजवळ 'पुढारी न्यूज'चे प्रतिनिधी ताजणे व माध्यम प्रतिनिधी योगेश खरे, अभिजित सोनवणे यांच्यावर पार्किंगमाफियांकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. यामध्ये ताजणे गंभीर जखमी झाले. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दाखल घेत पार्किंग ठेकेदार व मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या आदेश जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासनाने पार्किंगमाफियांच्या विरुद्ध आता मोहीम उघडण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणातील मारहाण करणारे आरोपी प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहेर, ऋषिकेश योगेश गांगुर्डे व इतर तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न व पत्रकार संरक्षण कलम अंतर्गत त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरावरून निषेध करण्यात आला होता. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घटना घडल्यानंतर काही वेळातच अपोलो हॉस्पिटल येथे जाऊन पत्रकार ताजणे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले व त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी करीत आहेत.
सदर पार्किंगचा ठेका अनिल शुक्ल खारघर, मुंबई याच्या एएस मल्टिसर्व्हिसेस कंपनीला मिळालेला आहे. मात्र, त्याच्याकडून सराईत गुन्हेगारांना हा पार्किंगचा ठेका चालविण्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर ठेकासुद्धा रद्द करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.