Jain Foundation 
नाशिक

Jain Foundation | जैन फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठित साहित्य व कला पुरस्कार जाहीर; प्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे यांना जीवनगौरव

Jain Foundation | प्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे यांना कांताई जैन 'साहित्य- कला जीवनगौरव' पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था असलेल्या भवरलाल अँड कांताई जैन फाउंडेशनतर्फे दिले जाणारे द्वैवार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून, 'कांताई जैन साहित्य- कला जीवनगौरव पुरस्कार' प्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे यांना, तर श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाबाई पुरस्कारासाठी डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई), बालगंधर्व पुरस्कारासाठी श्रीकांत डेरंगे (संगमनेर, जि. अहिल्यानगर) तसेच श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी अच्युत गोडबोले (मुंबई) यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

कांताई साहित्य- कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. तर कवयित्री बहिणाबाई, बालगंधर्व ठोंबरे, ना. धों. महानोर पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. भवरलालजी जैन यांच्या संजीवन दिनाच्या दुसऱ्या दिवशी दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी जळगाव येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची मुंबई येथे नुकतीच बैठक झाली. यात निवड समितीचे अध्यक्ष साहित्यिक ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या ज्योती जैन, रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. सिसिलिया काव्हार्लो, शंभूपाटील, भवरलाल अँड कांताई जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन व शोभा नाईक (बेळगाव) (दूरदृश्यप्रणालीद्वारे) यांची उपस्थिती होती.

चारही पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. 'भवरलाल अँड कांताई जैन फाउंडेशन' व 'बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट' यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङ्मयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते. या पुरस्कारांचे बीजरोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

"कला- साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांचा यथोचित गौरव व्हावा, यासाठी विविध स्तरावर रचनात्मक कार्य जैन उद्योग समूहामार्फत सुरूच असते. भवरलाल अँड कांताई जैन फाउंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे कला- साहित्य पुरस्कार जाहीर करताना आनंद होत आहे."
अशोक जैन, अध्यक्ष, भवरलाल अँड कांताई जैन फाउंडेशन
"महाराष्ट्रातील प्रातिनिधिक जाणकार साहित्यिकांच्या समितीने एकमतेने केलेली ही निवड आतापर्यंतच्या कला-साहित्य पुरस्कारप्राप्त लेखकांच्या परंपरेत शोभून दिसते."
डॉ. भालचंद्र नेमाडे, अध्यक्ष, निवड समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT