लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांसाठी समाधान देणारी बातमी समोर आली आहे. भारत आणि ओमानमध्ये आर्थिक भागीदारी करार १ जूनपासून लागू झाल्यानंतर भारतीय कांद्याला ओमानच्या बाजारपेठेत १०० टक्के शुल्कमुक्त प्रवेश मिळाला आहे.
त्यामुळे नाशिकच्या कांद्याला नव्या आणि स्थिर निर्यात सर्वसमावेशक बाजारपेठेची संधी उपलब्ध झाली आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याच्या आशा बळावल्या आहेत. या करारामुळे भारतीय कांदा ओमानमध्ये अधिक स्पर्धात्मक दरात उपलब्ध होणार आहे. परिणामी, ओमानमधील आयातदारांकडून भारतीय कांद्याची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त आहे. त्याचा थेट फायदा जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसह निर्यातदारांना मिळणार आहे.
सध्या आखाती देशांकडे कांदा निर्यात करताना वाहतूक खर्च आणि वेळेच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, ओमानची प्रमुख बंदरे अरबी समुद्रालगत असल्याने मुंबई बंदरातून रवाना झालेला कांदा अवघ्या ४८ तासांत ओमानमध्ये पोहोचू शकतो. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होण्याबरोबरच कांद्याची गुणवत्ता टिकवून ठेवणेही शक्य होणार आहे.