नाशिक : निखिल रोकडे
महापालिका निवडणूक कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १ कोटी १५ लाख १६ हजार ९३४ रुपयांची अवैध दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत पार पडलेल्या निवडणूक प्रक्रिया कालावधीत ही व्यापक कारवाई करण्यात आली.
निवडणूक व नववर्षारंभ काळात मद्यविक्री मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर परराज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली दारू अवैधरीत्या नाशिक जिल्ह्यात आणली जात असल्याच्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाया केल्या. अशा बेकायदेशीर मद्यविक्रीमुळे महाराष्ट्र राज्याचा हक्काचा महसूल बुडत असल्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा महत्त्वाचा विभाग असून, शासनाकडून या विभागाकडे विशेष लक्ष दिले जाते. राज्यात कायदेशीररीत्या उत्पादित व विक्री होणाऱ्या मद्यापासून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र परराज्यातील प्रतिबंधित दारूची अवैध वाहतूक व विक्रीमुळे शासनाच्या महसुलावर परिणाम होत असल्यामुळे अशा कारवायांना प्राधान्य देण्यात आले.
येवला, विंचूर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, विल्होळी, सापगाव, लेखानगर, दलपतपूर, पिंपळगाव बहुला, माडसांगवी व गिरणारे या परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक पथकाने छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारू, वाहने तसेच अन्य मुद्देमाल जप्त केला. या कारवायांमुळे निवडणूक काळात अवैध मद्यविक्रीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात विभागाला यश आले. निवडणूक काळात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शासनाचा महसूल सुरक्षित ठेवण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतूक याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोलफ्री क्रमांक १८००८३३ ३३३३, व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३- २५८१०३३ वर संपर्क साधावा.-संतोष झगडे, अधीक्षक, उत्पादन शुल्क