

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आल्याने, भाजप एकहाती सत्ता स्थापन करणार आहे. सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडी गतिमान होत असतानाच, स्वीकृत नगरसेवक पदासाठीदेखील आतापासूनच जोरदार लॉबिंग लावली जात आहे.
गेल्यावेळी महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवकांना संधी दिली होती. यावेळी शासनाने धोरण बदलल्यास स्वीकृतांची संख्या दुप्पट म्हणजेच दहावर जाण्याची शक्यता आहे. अशात स्वीकृतांचा आकडा अधिक असावा, अशी सर्वच पक्षांची अपेक्षा असणार आहे. कारण तिकीट वाटपात ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना संधी देण्याचा भाजपसह शिंदे सेना व ठाकरे सेनेचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान, भाजपने यापूर्वीच ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना स्वीकृत नगरसेवकांसह अन्य पदांवर संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतापासूनच भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी लॉबिंग लावली जात आहे. स्वीकृतसाठी इच्छुक असलेल्यांकडून शहराध्यक्षांसह स्थानिक नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी सध्या जोरदार हालचाली दिसून येत असून, कोणास स्वीकृतची लॉटरी लागेल याकडे आता लक्ष लागून आहे.
.. तर यावेळी १० स्वीकृत
महाराष्ट्र नगर परिषद व महानगरपालिका कायद्यानुसार महापालिका किंवा नगर परिषदेमधील एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्क्यांपर्यंत स्वीकृत नगरसेवक नियुक्त करता येतात. पूर्वी प्रत्येक महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा पॅटर्न होता. मात्र, सरकारने तो बदलून नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात स्वीकृत नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे शासनाने १० नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक नेमण्याचा निर्णय घेतल्यास, भाजप ७, शिंदे सेना २, तर ठाकरे सेनेकडून १ स्वीकृत निवडला जाणार आहे. तसेच १५ नगरसेवकांमागे एक स्वीकृत निवडल्यास भाजप ४, शिंदे सेना व ठाकरे सेना प्रत्येकी एक स्वीकृत निवडले जाण्याची शक्यता आहे.