नाशिक : अवैधरीत्या मद्याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग, ड विभाग यांनी धडक कारवाई करत साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गुन्हा दाखल करत एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
घोटी- सिन्नर रोडवरील साकूर फाटा, पिंपळगाव डुकरा (ता. इगतपुरी) येथे वाहन तपासणीवेळी कार (डी.डी. 01 जी. 7701) थांबविण्यात आली असता त्यात दमण-दीव व दादरा नगर हवेली येथे विक्रीस असलेले विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे एकूण 25 बॉक्स आढळून आले. या प्रकरणी वाहनचालक दीपक बक्तावरसिंह बीस्ट (35, रा. सिल्वासा, दादरा नगर हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक एन. एच. गोसावी, दुय्यम निरीक्षक आर. एन. सोनार, एस. आर. इंगळे, सहायक दुय्यम निरीक्षक हेमंत नेहेरे तसेच अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. एन. सोनार करीत आहेत.