

चांदवड : शेतकरी कर्जमाफीसह कांद्याला हमीभाव देण्यात यावा, वयोवृद्धांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन सुरू करावी, वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावेत यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी चांदवड बाजार समिती प्रवेशद्वारासमोरील चांदवड- मनमाड व लासलगाव महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली. सोमवारी आठवडे बाजार असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त तैनात होता. तहसीलदार अनिल चव्हाण व पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले. यात शासनस्तरावरून आंदोलनासंदर्भात ठोस व लेखी निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनात हनुमंत गुंजाळ, तुकाराम गायकवाड, योगेश राऊत, गणपत गुंजाळ, कारभारी माळी, शंकर गवळी, सुरेश पवार, शिवाजी गांगुर्डे, दौलत वराने, शब्बीर सय्यद, शिवाजी सोनवणे, शरद गुंजाळ आदी सहभागी झाले होते.