इगतपुरी आगाराच्या मनमानीला प्रवासी वैतागले File Photo
नाशिक

Public transport issues in Igatpuri : इगतपुरी आगाराच्या मनमानीला प्रवासी वैतागले

गरजू गावे फेऱ्यांपासून वंचित, प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात

पुढारी वृत्तसेवा

Igatpuri bus depot irregular services

घोटी : सोयीच्या ठिकाणी एकामागोमाग एक बसेसची सोय करणारे इगतपुरी आगार तालुक्यातील गैरसोयीच्या अतिदुर्गम व आदिवासी भागातील बसफेऱ्या मात्र मनमानी पद्धतीने कधीही सुरू व बंद करत आहे. आगाराच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांकडून निषेध करून संताप व्यक्त होत आहे.

आहुर्ली हे मध्यवर्ती गाव असून नाशिक, त्र्यंबकेश्वर व घोटी-इगतपुरी या तीनही दिशांना जोडणारा महत्त्वाचा वळण रस्ता आहे. तरीदेखील या मार्गावरून पहाटेची बस वगळता दिवसभरात एकही बसफेरी नसते. या परिसरातून अनेक विद्यार्थी, कामगार व शासकीय कामांसाठी प्रवास करणारे नागरिक असल्याने त्यांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. परिणामी दुप्पट खर्च करून त्र्यंबकेश्वर वा घोटीमार्गे नाशिक गाठावे लागते.

आगारातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान, इगतपुरीहून दुपारी एक ते दीड वाजता सुटणारी मानवधन विकास कार्यक्रमांतर्गत शालेय फेरीची बस आहुर्लीमार्गे असतानाच ती प्रवासी वाहतुकीसाठी भलत्याच मार्गावर चालवली जात असल्याचे समजते. ही शासनाची फसवणूक असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

कुशेगाव, मोडाळेची फेरी अनियमित

कुशेगाव, मोडाळे व शिरसाटे हे डोंगरदऱ्यातील दुर्गम व आदिवासी बहुल गावे आहेत. या भागातील दुपारची बसफेरी सातत्याने अनियमित असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. आदिवासी प्रवाशांसाठी सुविधा पुरविण्याऐवजी, शहरी भागात अनावश्यक बसफेऱ्यांचा अतिरेक होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

घोटी शहरातील रात्रीच्या बसफेऱ्यांचा प्रश्न कायम

घोटी शहरातून रात्रीच्या वेळी येणाऱ्या बसेस गावातून न जाता थेट उड्डाणपुलावरून बसस्थानकात पोहोचतात. यामुळे स्थानिक प्रवाशांना रात्रीच्या वेळी मोठी गैरसोय निर्माण होत आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही इगतपुरी आगार तसेच लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहे.

इगतपुरी आगार तालुक्याच्या नागरिकांसाठी आहे की केवळ लांब पल्ल्यांच्या प्रवाशांसाठी? आगारातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता, फोन उचलला जात नाही. भ्रमणध्वनीवरही योग्य प्रतिसाद मिळत नाही. अधिकारी नेहमी अनुपस्थित असतात. आदिवासी बहुल तालुक्यातील आदिवासी प्रवाशांची कुचंबना थांबविण्याची गरज आहे.
नवनाथ गायकर, नियमित प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT