Bhavali Dam Tourist Attack 
नाशिक

Bhavali Dam Tourist Attack | भावली धरण परिसरात पर्यटकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या 9 संशयित आरोपींची इगतपुरीत पोलिसांकडून धिंड

Bhavali Dam Tourist Attack | न्यायालयाकडून १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या नऊ संशयित आरोपींची इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळासह शहरातून धिंड काढत कायद्याचा धाक दाखविला. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना १८ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, हल्ल्यात वापरलेली साधने, वाहन तसेच लुटीतील ऐवज जप्त करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

रविवाारी (दि. १२) नाशिक येथील किरण भागवत यांचे कुटुंब भावली खुर्द येथील धबधबा पाहण्यासाठी गेले असता काही तरुणांनी महिलेशी अश्लील वर्तन करून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी कुटुंबाचा सुमारे १५ किलोमीटर पाठलाग करत लोखंडी व लाकडी दांडक्यांनी कारवर हल्ला केला. यावेळी सोन्याची साखळी व मोबाईलही हिसकावून नेल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी विशाल भटाटे, अनिकेत मानवढे, अनिरुद्ध भागडे, सागर ऊर्फ लोकेश गिते, विनोद बोराडे, सचिन आडोळे, अर्जुन आडोळे, देवीदास भगत आणि अजय दालभगत या नऊ संशयितांना अटक केली. न्यायालयात सरकारी पक्षाने हल्ल्यात वापरलेले साहित्य, वाहन व लुटीतील ऐवज जप्त करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. मुख्य आरोपी कैलास भागडे, आकाश भोईर व तुषार कडू हे अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पर्यटकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई

दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या नेतृत्वाखाली आरोपींची भावली येथील घटनास्थळ व इगतपुरी शहरातून धिंड काढण्यात आली. 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' अशी घोषणा देत पर्यटकांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT