नाशिक : महात्मानगर येथे विनापरवाना सुरू असलेल्या पंड्या रुग्णालयातील अवैध गर्भपात केंद्राचे प्रकरण अंगाशी आल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील सर्वच ६५७ रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहांची वर्षातून दोनदा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वतंत्र तपासणी पथके तैनात केली जाणार असून, विभागनिहाय रुग्णालयांचा अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती मुख्य आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिली आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका मातामृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय विभागाचे पथक महात्मानगर येथील पंड्या रुग्णालयामध्ये गेले असता, या रुग्णालयात अवैध गर्भपात केंद्र चालविले जात असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा साठाही आढळला होता. मात्र, या प्रकरणात अवैध गर्भपात केंद्र चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना, केवळ रुग्णालय विनापरवाना सुरू असल्याचा गुन्हा दाखल केला गेला.
यासंदर्भात विधिमंडळात लक्षवेधी सादर झाल्यानंतर तत्कालीन मुख्य आरोग्य- वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर शहरातील रुग्णालयांच्या परवाना नोंदणीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मुंबई शुश्रूषागृह अधिनियम १९४९ सुधारित नियम २००६ नुसार महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेले प्रत्येक रुग्णालय, नर्सिंग होम, शुश्रूषागृह यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करणे व दर तीन वर्षांनी नुतनीकरून करून घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, अनेक रुग्णालयांची नोंदणी बाकी असल्यामुळे तसेच रुग्णालयाच्या दर्शनी भागामध्ये रुग्णहक्क सनद व उपचार दरपत्रक यांची माहिती लावली जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच रुग्णालयांची वर्षातून दोनदा अर्थात सहामाही तपासणी करण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे.
रुग्णालयांची तपासणी करताना परवाना नोंदणी व नूतनीकरणाच्या अर्जात नमूद माहिती अर्थात खाटांची संख्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची माहिती खरी आहे का याची प्रत्यक्ष पडताळणी महापालिकेच्या वैद्यकीय पथकांमार्फत केली जाणार आहे. माहितीत तफावत आढळल्यास अथवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित रुग्णालयाला नोटीस बजावून वैद्यकीय परवाना रद्द केला जाणार आहे.
शहरातील सर्व रुग्णालये, प्रसूतिगृहे, गर्भपात केंद्रे, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी वैद्यकीय पथकांमार्फत केली जाणार आहे. गैरप्रकार आढळल्यास संबंधित रुग्णालयाची नोंदणी रद्द केली जाईल.डॉ. विजय देवकर, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका, नाशिक.