

नाशिक : बेकायदा गर्भपात केंद्र चालविल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या महात्मानगर येथील पंड्या हॉस्पीटलच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या गरोदर माता व अर्भक मृत्यू प्रकरणात या रुग्णालयाची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांचे पत्र महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला प्राप्त झाले असून, चौकशीची जबाबदारी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पिंपळद येथील गर्भवती महिला व तिच्या अर्भकाचा पंड्या हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला होता. चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे महिला व अर्भकाचा बळी गेल्याची तक्रार महिलेच्या पतीने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे केली होती. आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत सदर रुग्णालयाची चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले आहेत. विहित मुदतीत चौकशी अहवाल सादर न झाल्यास आयोगासमोर उपस्थित राहण्याचे समन्स पाठविण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. या पत्रावर आयोगाचे संशोधन अधिकारी अंकितकुमार सेन यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयास सदर पत्र प्राप्त झाल्यानंतर आयोगाच्या या पत्राचे गांभीर्य लक्षात घेत अपर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरण महापालिका हद्दीत घडले असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवत तातडीने अहवाल सादर करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे पंड्या हॉस्पीटलच्या अडचणीत वाढ झाली आहे.
माता मृत्यू प्रकरण घडल्यानंतर स्थानिक पातळीवर प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार महापालिकेचे वैद्यकीय पथक पंड्या हॉस्पीटलमध्ये प्राथमिक चौकशीसाठी गेले होते. त्याचवेळी रुग्णालयात अवैध गर्भपात केंद्र चालविले जात असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पंड्या हॉस्पीटलच्या चालकांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
पंड्या हॉस्पीटल संदर्भातील चौकशीचे पत्र नुकतेच वैद्यकीय विभागाला प्राप्त झाले आहे. आयुक्त तथा प्रशासक तसेच अतिरीक्त आयुक्तांशी चर्चा करून या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून तातडीने अहवाल सादर केला जाईल.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.