Nashik News | महात्मानगरला अवैध गर्भपात केंद्रावर छापा, औषधांचा मोठा साठा आढळला

डॉक्टरविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा
Nashik News
पंड्या हॉस्पिटलच्या अवैध गर्भपात केंद्रावर छापा टाकताना महापालिकेचे मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण. pudhari photo
Published on
Updated on

नाशिक : शहरातील महात्मानगर सारख्या उच्चभ्रू वस्तीतील पंड्या हॉस्पिटलमध्ये गेल्या ३० वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या वैद्यकीय पथकाच्या छाप्यात उघड झाली आहे. माता मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ही गंभीर बाब निदर्शनास आली. गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा मोठा साठाही याठिकाणी आढळून आल्याने तत्काळ पंचनामा करत अवैध गर्भपात केंद्र चालविणाऱ्या डॉ. आर. एम. पंड्या यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

महात्मानगर येथे गेल्या ३० वर्षांपासून पंड्या हॉस्पिटल आहे. केवळ एमबीबीएस शैक्षणिक अर्हता असलेल्या डॉ. पंड्या यांच्याकडून याठिकाणी सहा बेडचे रुग्णालय चालविले जात होते. या रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका महिलेचा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे दुसऱ्या एका रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रामध्ये कोणत्याही मातेचा मृत्यू झाला तर त्याची चिकित्सा करण्यासाठी माता मृत्यू समिती असून, या समितीचे प्रमुख असलेले महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत शेटे यांनी सोमवारी अचानक सकाळी पंड्या हॉस्पिटलला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी रुग्णालयांची कागदपत्रे तपासणी केली असता सदर रुग्णालयाची गेल्या ३० वर्षांपासून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. या ठिकाणी प्रसूतीपासून तर अवैध गर्भपातापर्यंत सर्व प्रकारचे उपचार होत असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाबरोबरच अन्न-औषध प्रशासन व गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. पंड्या यांच्याविरोधात महापालिकेने गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Nashik News
गर्भपात करणारी महिला डॉक्टर गजाआड

गर्भपाताच्या औषधांचा साठा

रुग्णालयाची अधिकाऱ्यांनी अधिक तपासणी केली असता अवैधरीत्या गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे १८ किट सापडले. त्यानंतर वैद्यकीय विभागाने अनेक प्रश्नांची उत्तरे डॉक्टर पंड्या यांच्याकडून मागितली. मात्र, त्यांनी मौन बाळगल्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर औषधे सील करण्यात आली आहेत.

अवैध केंद्रांच्या तक्रारीत तथ्य

साधारण सहा वर्षांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अवैधरीत्या गर्भपात करण्याचा प्रकार सुरू असल्याची बाब महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने उघडकीस आणली होती. म्हसरूळ येथील एका खासगी रुग्णालयाचा यामध्ये सहभाग आढळल्यानंतर हे प्रकरण राज्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरांमध्ये अवैधरीत्या गर्भपात सुरू असल्याच्या तक्रारी येत असल्या तरी तसे पुरावे आढळले नव्हते. आता मात्र पंड्या हॉस्पिटलवरील कारवाईने शहरात अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याच्या तक्रारींना पुष्टी मिळाली आहे.

महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या माता मृत्यूची चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर रुग्णालय नोंदणी नसणे, अवैधरीत्या गर्भपाताची औषधे वापरणे आदी धक्कादायक बाबी आढळल्या आहेत. याप्रकरणी अन्न-औषध प्रशासन व गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली जात आहे.

- डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य-वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Nashik News
कोल्हापूर : महिला पोलिस अधिकार्‍यास शिवीगाळ; सराईताला अटक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news