Maharashtra Honey Trap Case Nashik Police SIT
नाशिक : राज्यात गाजत असलेल्या 'हनी ट्रॅप' प्रकरणात लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाला महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, नाशिक किंवा ठाण्यात पहिला गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी चर्चा आता पुढे येत आहे.
राज्यातील तब्बल ७२ प्रशासकीय अधिकारी, आजी-माजी मंत्र्यांच्या हनी ट्रॅपप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत असले तरी, त्यास कुठल्याही स्वरुपाचा आधार नाही. मुंबई नाका परिसरात तारांकित हॉटेलचा मालक आणि ब्युटी पार्लर व्यावसायिक महिला या ट्रॅपचे मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची विधिमंडळातही खूरपूस चर्चा रंगली. आरोप-प्रत्यारोप झालेत. प्रत्यक्षात हे सर्व विनाआधार असल्याने, या प्रकरणाबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
राज्य शासनाकडून या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, गोपनीय पथक सक्रिय झाले असून, त्यांनी हॉटेलमालक आणि ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलेचे जबाब नोंदवले आहेत. ठाणे गुन्हे शाखा व नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल तक्रारींची सखोल चौकशी करण्यात आली आहे. तसेच, संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही पथकाने ताब्यात घेतल्याची चर्चा रंगत आहे.
दरम्यान, पथकाच्या हाती सबळ पुरावे लागल्याने, पथकाकडून ठाणे किंवा नाशिकमध्ये गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यास, या संपूर्ण प्रकाराचे बिंग फुटणार आहे.
हनी ट्रॅप प्रकरणात राज्यातील प्रशासकीय सेवेतील क्लास वन अधिकारी, आजी-माजी मंत्री यांची नावे असल्याने, प्रकरण दडपले जाणार असल्याचीही चर्चा आहे. जळगावमधील हनी ट्रॅप प्रकरणी राज्य शासनाने चौकशी समिती नेमली होती. समितीने राज्याच्या गृहविभागाला चौकशी अहवाल सादर केला होता. या प्रकरणाचा देखील विशेष पथकाकडून गृहविभागाला चौकशी अहवाल सादर केला जाऊ शकतो. त्यानंतर प्राप्त आदेशावरून गुन्हा दाखल करण्याबाबतचा निर्णय होऊ शकेल, असे बोलले जात आहे.