

नाशिक : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पथक नाशिकमध्ये तळ ठोकून असून, याप्रकरणी अनेक धागेदोरे पथकाच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील संबंधित महिला, हॉटेल मालकाव्यतिरिक्त शहरातील इतरही काही बडी नावे पथकाच्या रडारवर असल्याचीही चर्चा रंगत आहे.
शनिवारी (दि. १९) पथकाने मुंबई नाका परिसरातील हॉटेलमधील 'ती' खोली सील केल्याची माहिती पुढे आली होती. तसेच याप्रकरणातील संबंधित महिला आणि हॉटेलमालकाचा जबाबही नोंदविल्याची दिवसभर चर्चा रंगली हाेती. नाशिक पोलिसांनी मात्र या चर्चेचे खंडन केले होते. दरम्यान, रविवारी (दि. २०)देखील पथकाच्या कारवाईची शहरात एकच चर्चा होती. सलग दुसऱ्या दिवशी पथकाने या प्रकरणाशी निगडित बरीच माहिती हस्तगत केली असून, आणखी यामध्ये कोणाचा समावेश आहे, याची काही नावे पथकाच्या हाती लागल्याचे समजत आहे. पथकाने यापूर्वीच हॉटेलमधील त्या खोलीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतल्याने, अनेक बड्या अधिकारी, राजकारण्यांची नावे समोर येऊ शकतात. याशिवाय हनी ट्रॅपमध्ये महिला आणि हॉटेल मालकाव्यतिरिक्त इतरही काहींचा समावेश असल्याची माहिती पथकाच्या हाती लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हा संपूर्ण तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने केला जात असून, त्याबाबतची कुठलीच अधिकृत माहिती अद्याप पुढे येऊ शकली नाही. याशिवाय स्थानिक पोलिसांनीदेखील या संपूर्ण चर्चा तथ्यहिन असल्याचे स्पष्ट केले आहे.
हनी ट्रॅप प्रकरणातील मुख्य संशयित असलेली महिला कधीकाळी होमगार्ड असल्याची माहिती समोर येत आहे. होमगार्ड असताना या महिलेने क्राइम ब्रँच अधिकारी असल्याचे भासवत एका व्यक्तीकडे तब्बल ४० लाखांची खंडणी मागितली होती. त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून सापळा रचून, या महिलेचे बिंग फोडले होते. तेव्हा तिची होमगार्डच्या नोकरीवरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर तिने 'हनी ट्रॅप'चा प्लॅन आखला. होमगार्ड असताना, तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. ओळखीचा फायदा घेऊन ती अधिकाऱ्यांच्या भेटी घेत होती. नोकरीवरून काढल्याची भावनिक कथा अधिकाऱ्यांसमोर मांडायची. तसेच त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवायची. अधिकाऱ्यांसोबत सेल्फी काढून त्याचा गैरवापर करायची. अनेक अधिकाऱ्यांना तिने विधवा असल्याची बतावणीदेखील केली होती. अधिकाऱ्यांचा तिच्या बाजूने भावनिक कल दिसून आल्यानंतर ती त्यास जाळ्यात अडकवायची. पुढे प्रकरण हॉटेलपर्यंत जायचे. हॉटेलमालकाशी तिचे साटेलोटे असल्याने, नंतर खंडणी वसूल करण्याचे प्रकार केले जायचे. या कटात काही वकील मंडळीही सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. ही महिला वकिलांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायची. एका वळणावर वकीलच संबंधित अधिकाऱ्यांना, 'साहेब सेटलमेंट करून टाका, आम्ही तिचे वकीलपत्र घेत नाही' असा सल्ला देत असल्याचीही माहिती समोर येत आहे.