महाराष्ट्रात सिंगापूरमधून सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक file photo
नाशिक

महाराष्ट्रात सिंगापूरमधून सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : सतीश डोंगरे

उद्योगात अव्वलस्थानी असलेल्या महाराष्ट्राचे स्थान गुजरातने घेतल्याच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी मंडळींनी महाराष्ट्र थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) अव्वलस्थानी असल्याचे आकडेवारीनिशी स्पष्ट केले. विरोधकांनी यावरही टीकेची झोड उठवून दिली असली तरी, २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतात, त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक सिंगापूरमधून आल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत ७० हजार ७९५ कोटींची थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून, देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के विदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची एक्स पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ६ सप्टेंबर रोजी केली होती. यावरून विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या एकमेकांवर फैरीही झाडल्या गेल्या. परंतु, २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास, देशात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक सिंगापूरमधून आली असून, त्याचे प्रमाण ११.७७ अब्ज डॉलर इतके आहे. तर राज्याचा विचार केल्यास, सिंगापूरमधून आलेल्या गुंतवणुकीत महाराष्ट्राचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात मॉरिशस, यूएस, युके, संयुक्त अरब अमिराती (यूएई), केमन आयलंड, जर्मनी आणि सायप्रस या प्रमुख देशांमधून भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक केली गेली होती. मात्र, जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर त्यात घट झाली आहे. तुलनेत सिंगापूर, जमान आणि नेदरलॅण्डमधून गुंतवणूक वाढली आहे. २०१८-१९ आर्थिक वर्षापासून सिंगापूर हे भारतासाठी विदेशी गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्त्रोत ठरत आहे. तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात मॉरिशसमधून सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक भारतात केली गेली होती.

आर्थिक अनिश्चिततेची भीती

जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशातील विदेशी गुंतवणुकीचा ओघ ३.५ टक्क्यांनी घसरून ४४.४२ अब्ज डॉलरवर आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात देशात ४६ अब्ज डॉलरपेक्षा जास्त थेट विदेशी गुंतवणूक आली. त्यात सिंगापूरमधून आलेल्या गुंतवणुकीत तब्बल ३१.५५ टक्क्यांची घसरण झाली.

सिंगापूरची भारतातच गुंतवणूक का?

सिंगापूरमध्ये देशांतर्गत कर व्यवस्था भारताच्या तुलनेत अधिक कठोर असल्याने सिंगापूरसह मॉरिशस भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तसेच सिंगापूर हा भारताचा आठवा सर्वात मोठा आशिया खंडातील व्यापार भागीदार आहे. द्विपक्षीय देशांमध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३५.५८ अब्ज डॉलर इतका व्यापार झाला होता. २०२१-२२ च्या तुलनेत त्यात १८ टक्के वाढ झाली होती. २०२४-२५ मध्ये त्यात आणखी वाढ होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातून निर्यात

महाराष्ट्रातून सिंगापूरला सर्वाधिक मौल्यवान दागिने, रत्न आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली जाते. याशिवाय मोटार वाहने, लोखंड, स्टीलचीही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात असल्याने, महाराष्ट्रात विदेशी गुंतवणुकीकडे सिंगापूर आकर्षिले जात आहे.

'सुरक्षा, सरकारी धोरणे, पायाभूत सुविधा आणि गेल्या अडीच वर्षांमधील सरकारची स्थिरता' या जमेच्या बाबींमुळे महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. सिंगापूरने महाराष्ट्रात अन् देशात थेट विदेशी गुंतवणूक करण्याचे कारण दोन्ही देशांमधील कररचना हेदेखील आहे.
- डॉ. विनायक गोविलकर, अर्थतज्ज्ञ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT