नाशिकरोड : परिसरातील खासगी शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतल्या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे
श्रेया किरण कापडी (रा. गंधर्वनगरी, नाशिकरोड) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती जेल रोड येथील सेंट फिलोमिना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होती. मंगळवारी (दि. 5) सकाळच्या सुमारास शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना तिला अचानक चक्कर येऊन ती मैदानावर कोसळली.
ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच तत्काळ तिला नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. श्रेयाचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून, तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अचानक जाण्याने शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.