
नाशिक : आसिफ सय्यद
लहान मुलांमधील हृदयरोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते शालेय विद्यार्थ्यांच्या तपासणीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या
शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षात तब्बल ९ हजार ७६८ विद्यार्थ्यांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर दहा वर्षातील हृदय शस्त्रक्रियेचा हाच आकडा १८,७७३ इतका आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावर सहा वर्षाच्या आतील मुलांची वर्षातून दोन वेळा तर शासकीय, निमशासकीय शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचीही आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीत दरम्यान आढळून आलेल्या आरोग्यविषयक समस्येवर योग्य ती संदर्भ सेवा व सर्व प्रकारचे वैद्यकीय व शल्य चिकित्सक उपचार पुरविण्यात येतात. यासाठी राज्यात १ हजार १९६ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यात राज्याच्या ग्रामीण व शहरी भागासाठी १ हजार ११०, बृहन्मुंबईसाठी ५५ तर आदिवासी जिल्ह्यांतील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी ३१ पथके कार्यरत आहेत. या तपासणीत गेल्या तीन वर्षात ९ हजार ७६८ बालकांना हृदयाशी संबंधित गंभीर आजार असल्याचे आढळून आले. त्यातील ९ हजार ३३७ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बालकांमधील हृदयरोगाचे हे वाढते प्रमाण भविष्यातील आरोग्यविषयक अडचणींचा आरसा मानले जात आहे.
जन्मजात हृदयदोष : काही मुले जन्माला येतानाच हृदयामध्ये काही दोष घेऊन येतात, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंचे कार्य व्यवस्थित होत नाही.
संधिवत हृदय रोग : स्ट्रेप थ्रोट किंवा स्कार्लेट फीवर सारख्या संसर्गामुळे संधिवात हृदय रोग होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाच्या वाल्व आणि स्नायूंना नुकसान होऊ शकते.
कावासाकी रोग: हा रोग प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होतो आणि त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना किंवा कोरोनरी धमन्यांना नुकसान होऊ शकते.
कार्डिओमायोपॅथी : हृदयाच्या स्नायूंचा आजार, जो अनुवांशिक विकारामुळे किंवा संसर्गानंतर होऊ शकतो.
मायोकार्डिटिस : विषाणूजन्य संसर्गामुळे हृदयाच्या स्नायूंना सूज येते आणि ते खराब होऊ शकते.
लहान मुलांमध्ये हृदयरोगाची लक्षणे अनेकदा वेगळी दिसू शकतात. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, थकणे, छातीत दुखणे, मळमळ, उलट्या, घाम येणे, वजन वाढणे, किंवा अचानक मूर्च्छा येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
हृदयरोगावर अनेकदा औषधोपचार, शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय प्रक्रियांद्वारे उपचार केले जाऊ शकतात. काही हृदयरोगांवर औषधांनी उपचार केले जाऊ शकतात, जसे की उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधे. काही हृदयरोगांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते, जसे की हृदय वाल्व बदलणे किंवा हृदयातील दोष दुरुस्त करणे. काही वेळा इतर वैद्यकीय प्रक्रिया, जसे की कॅथेटरचा वापर करून हृदयातील समस्या दुरुस्त करणे आवश्यक असू शकते.
चुकीचा आहार मुलांच्या हृदयासाठी घातक ठरतो. कोल्ड ड्रिंक्स, चिप्स, पिझ्झा, बर्गर यामुळे लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढतो. मुलांना ताजे अन्न, फळे, भाज्या नियमित दिले पाहिजे आणि पॅकेज्ड फूड टाळले पाहिजे. वेगवेगळे खेळ खेळले पाहिजे, व्यायाम, योगा केला पाहिजे. वेळोवेळी आरोग्य तपासणी करून हृदयाचे आरोग्यदेखील जपले पाहिजे.
डॉ. गौरव वर्मा, हृदयविकार तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल, नाशिक.