
नवी दिल्ली : सध्याच्या धकाधकीच्या, गळेकापू स्पर्धेच्या आणि असुरक्षिततेच्या काळात ताणतणावाला अनेक लोक बळी पडत आहेत. तणाव हा मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यावरही तितकाच दुष्परिणाम करत आहे. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण हा एक चिंतेचा विषय ठरला असून वेळीच उपचार यावर करण्याची आवश्यकता आहे. अशा समस्या टाळण्यासाठी काय करता येईल, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
हल्ली तरुणांना शिक्षण, नोकरी, सोशल मीडिया, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक अपेक्षांच्या ओझ्यामुळे उच्च पातळीच्या तणावाचा सामना करावा लागतोय. 20 ते 30 वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, रक्तातील साखरेची उच्च पातळी, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या आजारांचे निदान होत आहे. तणाव हा एक सायलेंट किलर ठरतो आहे, जरी त्याची लक्षणे लगेच दिसून येत नसली तरी. त्यामुळे एखाद्याला जीवघेण्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो.
तणाव हे कॉर्टिसोलची पातळी वाढवते, जे एक तणाव संप्रेरक आहे व त्याचा समतोल बिघडल्यास ते रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढवू शकतो तसेच पोटाभोवती चरबी साठवण्यास सुरुवात होते, ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. जे हृदयरोग आणि मधुमेहासाठी जोखीम घटक ठरत आहेत. दुर्देवाने तरुण वयोगटातील रुग्ण हे त्यांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. तरुणांनी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे ही काळाची गरज आहे.
झोपेच्या कमतरतेमुळे तणाव वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येतात. यासाठी एक वेळ निश्चित करून दररोज त्याच वेळी झोपायला जाण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा, अगदी वीकेंडला सुद्धा त्याच वेळापत्रकाचे पालन करा. रात्री किमान 7 ते 8 तास शांत झोप घेणे आवश्यक आहे. विविध अभ्यासांनुसार, शारीरिक हालचाली, व्यायाम हे कॉर्टिसोलसारखे तणाव संप्रेरक कमी करण्यास मदत करतात आणि मेंदूतील तणाव कमी करणारे एंडोर्फिनसारखे संप्रेरकाचे प्रमाण वाढवतात.
केवळ जिमला जाऊनच व्यायाम करावा असे काही नाही, तर चालणे, नृत्य करणे, सायकल चालवणे हे व्यायाम प्रकारदेखील जिमला जाण्याइतकेच प्रभावी ठरतील. जंक फूडचे सेवन टाळून आहारात फळे, भाज्या, तृणधान्य आणि कडधान्यांचे सेवन करा. शर्करायुक्त पदार्थ आणि तळलेले पदार्थ ताण हे तुमच्या शरीराकरिता अहितकारक ठरतात. त्यामुळे तुम्हाला योग्य पोषण न मिळाल्यास थकवा जाणवू शकतो. जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्ख, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थांचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा.
दिवसातून फक्त 10 मिनिटे लांब श्वास घेणे किंवा श्वासोच्छवासाचा व्यायाम करणे हे तुमचे मन शांत करू शकते. योग आणि ध्यान हे आपल्या भावनांचे व्यवस्थापन करण्यास, लक्ष केंद्रित करण्यास आणि शरीराला आराम देण्यास मदत करतात. तणावमुक्त राहण्यासाठी बर्याचदा डिजिटल ब-ेक घेणे गरजेचे आहे. वाढत्या स्क्रिन टाईममुळे एखादी व्यक्ती चिंताग्रस्त होऊ शकते आणि झोपेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होऊ शकतो. डिजिटल डिटॉक्स हा पर्याय वापरून पाहा.