नाशिक : गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोने खरेदी करताना महिला  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Gurupushyamrut Muhurta | गुरुपुष्यामृत मुहूर्तावर चोख सोने खरेदी

तब्बल 21 वर्षांनी आलेला योग ग्राहकांनी साधला; दर लाखाच्या पार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत असा २१ वर्षांनी जुळून आलेला दुर्मिळ योग साधत ग्राहकांनी चोख सोने खरेदीला प्राधान्य दिले. सोने आणि चांदीने यापूर्वीच एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, अशातही अनेकांनी मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीचा योग साधला. बहुतांश ग्राहकांनी चोख सोने खरेदी करून गुंतवणूक केली.

गुरुपुष्यामृत योग कायमस्वरूपी प्रगतीसाठी शुभ मानला जातो. या योगामध्ये सोने, वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यातच २१ वर्षांनी दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत या योग जुळून आल्याने, सोने खरेदीसाठी ग्राहकांनी चांगलीच गर्दी केली होती. दर एक लाख पार असल्याने, ग्राहकांचा प्रतिसाद मंदावेल, अशी भीती सराफ व्यावसायिकांना होती. सकाळी मुहूर्त नसल्याने, सराफ बाजारात तसा शुकशुकाट होता. मात्र, दुपारी ४.४३ पासून पुढे मुहूर्त असल्याने, सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली.

दरवाढीचा खरेदीवर काहीसा परिणाम झाला असला तरी, ग्राहकांनी चोख सोने खरेदीतून गुंतवणुकीस प्राधान्य दिले. मागील काही काळापासून सोने-चांदीत गुंतवणूक वाढली आहे. आगामी सणासुदीच्या काळात दर आणखी भडकण्याची शक्यता असल्याने, गुंतवणूकदार सध्या सक्रीय झाले आहेत. मात्र, वाढते दर सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.

दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत असा योग जुळून आल्याने ग्राहकांनी मुहूर्तावर सोने खरेदीस प्राधान्य दिले. विशेषत: चोख सोने खरेदी केले गेले. मुहूर्तावर ग्राहकांचा समाधानकारक प्रतिसाद लाभला.
गिरीष नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.

गुरुवारी असे होते दर

  • २४ कॅरेट सोने - प्रति तोळा - एक लाख दोन हजार ७३ रु.

  • २२ कॅरेट सोने - प्रति तोळा - ९३ हजार ९०७ रु.

  • चांदी प्रति किलो - एक लाख १५ हजार रु.

  • (सर्व दर जीएसटीसह)

दीपआमवस्या मुहुर्तावर रामकुंडावर स्नानासाठी गर्दी

दीपपूजनाने दीपआमवस्या उत्साहात

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिव्यांची घराेघरी पूजा करून गुरुवारी (दि. २४) दीपअमावस्या साजरी झाली. शाळांमध्येही विद्यार्थ्यांनी दिव्यांची पूजा करत या सणाचे महत्व जाणून घेतले. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे.

‘शुभंकरोती कल्याणम‌ आरोग्य धनसंपदा' या मंत्राचा जप करत शाळांमध्ये चिमुकल्यांनी केली दीप पूजा

शुक्रवारपासून (दि.25) श्रावणमास सुरू झाला आहे. त्याआधीचा दिवस दीप अमावस्येचा असतो. यानिमित्ताने घरोघरी गृहिणींनी घरातील दिवे, समई, निरंजनी, लामणदिवे आदी तेजाची उपकरणे घासून स्वच्छ करत पाट किंवा चौरंगावर मांडून त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढली. पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून पिठाचे दिवे ठेवले. दिव्यांवर हळदी-कुंकू आणि फुले अर्पण करून गृहिणींनी मनोभावे पूजा केली. ‘शुभंकरोती कल्याणम‌ आरोग्य धनसंपदा' या मंत्राचा जप करुन नैवेद्य दाखवून आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन आयुष्य उजळावे, अशी प्रार्थनाही केली गेली. काही घरांमध्ये कणकेचे गूळ घालून उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यातील एक कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेऊन तो देवापुढे ठेवला जातो.

नाशिक : दीपअमावस्येनिमित्त घरोघरी दीपपूजन करण्यात आले,

आषाढ अमावस्येला दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या म्हणून ओळखले जाते. या अमावस्येला तेलाचा दिवा लावल्याने शनि दोषांपासून मुक्ती मिळते व दानधर्म केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, अशी धारणा आहे. असे विधीही काही घरांमध्ये करण्यात आले. दरम्यान, अमावस्येनिमित्त रामकुंडावरही भाविकांनी सकाळी स्नानासाठी गर्दी केली होती. यामध्ये पर्यटक आणि अन्यप्रांतीय नागरिकांची संख्या अधिक होती.

बालवाडी, ‘किंटर गार्डन’मध्ये देखील दिव्यांची पूजा

दीप आमावस्येची माहिती, त्याचे महत्व चिमुकल्यांना कळावे म्हणून शहरातील बालवाडी, नर्सरीसह काही पूर्व प्राथमिक शाळांनी विद्यार्थ्यांना घरुन दिवा, पणती, समई, निरंजन आणण्यास सांगितले होते. अनेक शाळांमध्ये प्रकाश देणाऱ्या या उपकरण, साहित्याची पूजा झाली. शिक्षकांनी दीप आमवस्येचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. काही शाळांमध्ये यानिमित्ताने श्लोक, स्तोत्र स्पर्धांचे आयोजन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT