

नाशिकरोड : सिंधी समाजाच्या श्रद्धेचा आणि संयमाचा प्रतीक असलेल्या चालीहा साहिब उपवास पर्वास सिंधी पंचायतीच्या रामी भवन येथे विधिवत सुरुवात झाली. २१ जुलैपासून सुरू झालेला हा धार्मिक उपवास महोत्सव ३० ऑगस्टपर्यंत चालणार असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उपवास पर्वाची सुरुवात सकाळी पूज्य बहिराणा साहिब यांच्या स्थापना व पूजनाने करण्यात आली. या चाळीस दिवसांच्या पर्वात उपासक दाढी व केस न कापणे, एकवेळ साधे अन्न ग्रहण करणे, साधी राहणीमान अंगीकारणे आदी नियम पाळतात. या सोहळ्याला नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष प्रकाश आहुजा, उपाध्यक्ष शाम मोटवानी, तसेच शंकर जयसिंगानी, सतीश पंजवानी, अनिल आहुजा आदी मान्यवर उपस्थित होते.
या काळात होणारे प्रमुख कार्यक्रम असे...
३ ऑगस्ट – विद्यार्थी गुणगौरव सोहळा
१० ऑगस्ट – रामकुंडावर गोदा आरती
१५ ऑगस्ट – हिंगलाज माता दर्शन
१७ ऑगस्ट – १०८ बहिराणा साहिब विशेष पूजा
२४ ऑगस्ट – सिंधी भक्तिगीतांचा कार्यक्रम
३० ऑगस्ट – चालीहा साहिब पर्वाचा समारोप
अशी आख्यायिका आहे की, प्रसिद्ध राजा मिर्ख यांनी त्यांच्या राज्यातील सिंधी लोकांना त्यांच्या धर्मात धर्मांतर करण्याचा आदेश दिला होता परंतु त्यांनी एकत्र उभे राहून योग्य अन्न, कपडे, निवारा न घेता नदीजवळ पूजा, आरती (ज्योत) आणि पुकार केले. चाळीस दिवसांनंतर, झुलेलाल साई नदीतून बाहेर पडले आणि त्यांनी असे पवित्र स्पंदने पाठवले की, सिंधी संस्कृती जपता आली आणि लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यापासून वाचवता आले. उद्धव रूपचंदानी सांगतात, “ते खास ज्योत फाळणीच्या वेळी पाकिस्तानहून उल्हासनगरला आणण्यात आले होते. सिंधी बहुल समाजात चाळीस दिवस उपवास करण्याची परंपरा अजूनही सुरू आहे. भगवान झुलेलाल यांना पालवन वारो असेही म्हणतात, ज्याचा अर्थ सिंधी लोक त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांची पूजा करतात आणि प्रार्थना करतात.