Shravan Mahina Shivamuth 2025
नाशिक : सण-उत्सव, व्रतवैकल्यांचा महिना म्हणून चैतन्यदायी श्रावण मासाला शुक्रवार (दि.२५) पासून प्रारंभ होत आहे. पूजेची साहित्य, हार, फुलांसह नैवद्यांच्या साहित्याने बाजार सजला आहे.
गेल्या वर्षी श्रावण महिन्याचा प्रारंभ सोमवारपासून झाला होता तर यंदाही बऱ्याच वर्षांनंतर श्रावणमास जुलै महिन्यात आला आहे. या मासात अनेक सणांची मांदियाळी असल्याने भाविकांमध्ये उत्साह असतो. श्रावणमासानिमित्त शहरातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजणार आहे. गोदाकाठावरील तसेच शहर व परिसरातील महादेव मंदिरांची स्वच्छता तसेच सजावटींचे काम पूर्णत्वास आली आहेत. मंदिरांची नगरी म्हणून नाशिकमध्ये श्रावण मासाचा उत्साह अधिक असतो. बाजारातही चैतन्य दिसत आहे. पूजेचे साहित्य, हार, फुल, नारळ तसेच नैवद्याच्या साहित्याने बाजारही सज्ज झाला आहे. शहरातील शिवालयांमध्ये शंभोशंकराचे महापूजन, महाप्रसाद, भंडारा आदी धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली.
श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रिय असणारे बेलपत्र, फुले, दुर्वा, नारळ, कापूर, उदबत्ती या आणि अन्य पूजा साहित्यांनी बाजार सजला आहे. विशेषत: गोदाघाटावरील शिवमंदिराच्या परिसरात विक्रेत्यांनी पूजेचे साहित्य भरुन ठेवल्याचे चित्र आहे.
गोदाकाठावरील कपालेश्वर, निळकंठेश्वर, नारोशंकर या शिवमंदिरांसह, रामवाडी पुलाजवळील सिद्धेश्वर तसेच तिळभांडेश्वर, गंगापूर रोडवरील सोमेश्वर या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून रांगा लागल्या आहेत. या सर्वच मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई तसेच रंगरंगोटीची कामे पूर्णत्वाला आली असून मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणाने भक्तांनाही प्रसन्न वाटत आहे.
पहिला सोमवार : २८ जुलै- तांदूळ
दुसरा सोमवार : ४ ऑगस्ट -तील
तिसरा सोमवार : ११ ऑगस्ट -मूग
चौथा सोमवार १८ ऑगस्ट-जवस
मंदिर परिसरात भव्य मंडप, कळसावर रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना सुरक्षित आणि सुरळीतपणे दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने, महापालिका, अग्नीशमन विभाग, पोलिस विभाग, गंगेवरील जीवरक्षक दल यांचे सहकार्याने भाविकांचे सुरक्षेसाठी संपूर्ण नियोजन केले आहे.
मधुकर पाटील, अध्यक्ष, सोमेश्वर मंदिर देवस्थान.