नाशिक

Gondeshwar Temple Sinnar | सिन्नरच्या ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिर संवर्धनासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

Gondeshwar Temple Sinnar | खासदार वाजे यांच्या पाठपुराव्याला पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
सिन्नरचे ऐतिहासिक वैभव असलेल्या १२व्या शतकातील गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धन आणि परिसर विकासाबाबत महत्वपूर्ण घडामोडी घडली आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सततपूर्ण पाठपुराव्याला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विभागाचे महानसंचालक यादविर सिंह रावत यांनी ९ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रातून प्रस्तावित कामांची माहिती दिली आहे.

मंदिराचे शिखर, नंदी मंडप आणि मुख्य मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी तांत्रिक अंदाजपत्रक अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कामे आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, निधीची औपचारिक प्राप्ती अद्याप प्रलंबित आहे.

मंदिर परिसरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, बाके आणि कचरापेट्यांची नियमित देखमाल सुरू आहे. पायवाटा, पाणीपुरवठा आणि सुशोभीकरणाच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली आणि सूर्याभिषेकाचे वैशिष्ट्य सांगणारे माहितीफलक उभारण्यासह चालू आर्थिक वर्षासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

व्यावसायिक हालीचांवर नियंत्रण ठेवून मंदिराचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपले जाणार आहे. गोंदेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून महाराष्ट्राच्या मध्ययुगीन स्थापत्यकलेचा महत्त्वपूर्ण वारसा आहे. त्यामुळे मंदिराच्या संवर्धनासाठी प्रस्तावित कामे वेळेत सुरू होणे, निधी प्रत्यक्ष उपलब्ध होणे आणि कामांचा दर्जा कायम राखणे या बाबींना विशेष महत्त्व आहे.

खासदार वाजे यांच्या पाठपुराव्याला मिळालेल्या या प्रतिसादमळे मंदिराच्या संवर्धनाबाबत आशा निर्माण झाली असली, तरी दहा कोटींच्या निधीची प्रत्यक्ष प्राप्ती आणि दुरुस्तीच्या कामांची सुरुवात हे पुढील महत्त्वाचे टप्प्ये असतील.

सूर्याभिषेकाचे वैशिष्ट्य जपणार:

मंदिराचे ऐतिहासिक दृश्यवैभव आणि सूर्याभिषेकाशी संबंधित खगोलीय संरेखण कायम ठेवण्यासाठी संरक्षित हद्दीतील नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. मंदिरापासून १०० मीटर परिसर प्रतिबंधित, तर पुढील २०० मीटर परिसर नियंत्रित राहील. प्रतिबंधित क्षेत्रात नवीन बांधकामांना परवानगी नसून, नियंत्रित क्षेत्रात संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक असेल.

"गोंदेश्वर मंदिर हा सिन्नरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे मूळ स्थापत्य वैभव, सूर्याभिषेकाचे वैशिष्ट्य आणि वारसा जपणे आवश्यक आहे. मंजूर निधी प्रत्यक्ष उपलब्ध होऊन संवर्धनांची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील."
— राजाभाऊ वाजे, खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT