Gold Price Hike  Pudhari File Photo
नाशिक

Gold Price Hike | सोने दराचा ऐतिहासिक उच्चांक

सोने प्रतितोळा 1100, तर चांदी प्रतिकिलो 3 हजार रुपयांनी वधारली

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • ट्रम्प टॅरिफच्या धसक्याने सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दराचा उच्चांक

  • सणासुदीत सोने-चांदी खरेदीचे स्वप्न बघणाऱ्यांची निराशा

  • रूपयाचे ऐतिहासिक नीचांकी स्तरावर घसरलेले मूल्य हे या दरवाढीमागील प्रमुख कारण

नाशिक : रुपयाचे घसरलेले मूल्य आणि ट्रम्प टॅरिफच्या धसक्याने सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दराने सोमवारी (दि. १) ऐतिहासिक उच्चांक गाठला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.१) रोजी सकाळी बाजार उघडताच सोन्यासह चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. सोने प्रतितोळा ११०० रुपयांनी तर चांदी तब्बल ३ हजार रुपये प्रति किलोने महागली. सोन्याची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या जळगावी सोने जीएसटीसह प्रतितोळा १ लाख ७ हजार ७३८ रुपये तर चांदी प्रतिकिलो जीएसटीसह १ लाख २७ हजार ७२० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सणासुदीत सोने-चांदी खरेदीचे स्वप्न बघणाऱ्यांची निराशा झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहेत. रूपयाचे ऐतिहासिक नीचांकी स्तरावर घसरलेले मूल्य हे या दरवाढीमागील प्रमुख कारण सांगितले जात आहे. रुपया कमजोर झाल्यानंतर आयात खर्च वाढल्याने दोन्ही धातुंच्या किमती दररोज वाढत आहेत. याशिवाय, अमेरिकेने जाहीर केलेल्या ५० टक्के आयात शुल्क, फेडरल बँकेच्या बैठकीनंतर व्याज दर कमी होण्याची शक्यता असल्याने याचा परिणाम सोने-चांदी दरवाढीवर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी, (दि.१)जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी १ लाख ४ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर जीएसटीसह हा दर १ लाख ७ हजार ७३८ रुपयांवर पोहोचला. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ९५ हजार ८१५ (जीएसटी ९८६८९) रुपये प्रति तोळा इतका झाला.

चांदीची चमकही वाढली

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दराने देखील मोठी उसळी घेतली आहे. चांदी दरात तब्बल ३ हजार रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. चांदी प्रतिकिलो १ लाख २४ हजारावर पोहोचली आहे. तर जीएसटीसह चांदी १ लाख २७ हजार ७२० रुपये प्रति किलोवर पोहोचली. ऐन सणासुदीच्या काळात सोने, चांदीची ऐतिहासिक दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या उत्साहावर मात्र विरजण पडले आहे.

नाशिकमध्येही दरवाढ

नाशिकमध्ये सोने दर प्रति तोळा १ लाख ७ हजार रुपये तर चांदी प्रति किलो दर १ लाख २६ हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहेत. सोने, चांदी दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर देखील झाला आहे. सोने-चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची हौस भागवायची कशी असा सवाल महिला ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT