

Gold prices have recorded a continuous increase again in ten days
नाशिक : जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोने बाजारात सातत्याने चढउतार बघावयास मिळत आहेत. एक लाखाचा टप्पा पार केल्यानंतर सोन्याच्या किमतीला घसरण लागल्याने, सोने पुन्हा लाखांच्या आत आले होते. मात्र, मागील दहा दिवसांत पुन्हा सोने दरात सातत्याने वाढ नोंदविली गेल्याने, शनिवारी (दि.१९) सोने लाखाच्या पार गेले आहे.
१० जुलै रोजी २४ कॅरेट सोने दर प्रतितोळा ९८ हजार ४३० रुपये इतका होता. मागील दहा दिवसांतील १५ आणि १६ जुलै या दोन दिवसांचा अपवाद वगळता सोने दरात सातत्याने वाढ नोंदविली गेली. त्यातच शनिवारी (दि. १९) थेट ८०० रुपयांनी सोने दर वाढल्याने, सोन्याने पुन्हा एकदा लाखाचा टप्पा पार केला आहे. शनिवारी (दि.19) रोजी २४ कॅरेट सोने दर प्रतितोळा एक लाख ७० रुपये इतका नोंदविला गेला. तर २२ कॅरेट सोने दर प्रतितोळा ९१ हजार ७३० रुपये इतका नोंदविला गेला आहे.
दरातील वाढ मध्यमवर्गीय ग्राहकांच्या चिंतेत भर घालणारी असली तरी, गुंतवणूकदारांचा हुरूप वाढविणारी असल्याचे सराफ व्यावसायिक सांगत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही वादग्रस्त निर्णयाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असून, त्याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमती वाढण्यावर होत आहे.
चांदीत शनिवारी तब्बल २,१०० रुपयांची वाढ नोंदविली गेल्याने, चांदी दर प्रतिकिलो एक लाख १६ हजारांवर पोहोचले आहेत. आगामी दिवाळी, दसरा या सणासुदीच्या काळात चांदी दीड लाखाचा टप्पा गाठेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.