

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. किरकोळ बाजारात सोन्याने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर मंगळवारी प्रति १० ग्रॅम ९९,१७८ रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला. हा दर मागील सत्रातील दरापेक्षा जवळपास १,९०० रुपयांनी अधिक आहे.
सोमवारी जीएसटी वगळता, सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७,२०० रुपयांवर होता. तर ३ टक्के जीएसटीसह हा दर किरकोळ बाजारात सोन्याच्या दराने १ लाख रुपयांचा टप्पा पार केला. दरम्यान, आज एमसीएक्सवर सोन्याचा दर ०.३३ टक्के वाढून प्रति किलो ९५,५६२ रुपयांवर खुला झाला.
दिल्लीत २४ कॅरेट म्हणजे शुद्ध सोन्याचा दर १,६५० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९९,८०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात सोने खरेदी करताना जीएसटीसह घडणावळ खर्च आकारला जातो. यामुळे प्रति तोळा सोन्याचा दर १ लाख रुपयांवर गेला आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १ हजारांवर पोहोचला आहे. चेन्नई आणि बंगळूरमध्येही सोने १ लाख पार झाले आहे.
जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यावर व्याजदर कपातीवरून जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉलर निर्देशांक ३ वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला. आज, यूएस डॉलर निर्देशांक ०.१६ टक्के घसरणीसह ९८.१२ च्या जवळ होता. अमेरिकन डॉलरमधील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळेही सोन्याला सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन) म्हणून मागणीही वाढली आहे. परिणामी सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.