नाशिक : शनिवार (दि.27) रोजी सायंकाळपासून रविवार (दि.28) पर्यंत नाशिक शहरासह त्र्यंबक तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणात पाण्याची मोठी आवक सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सुमारे 10 हजार 988 क्यूसेकने दुपारी अडीचपर्यंत 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने गोदावरीला महापूर आला असून, गोदामाईने रौद्ररुप धारण केले.  (छाया : हेमंत घाेरपडे)
नाशिक

Godavari Floods Nashik : गोदावरीला महापूर; नाशिककरांनी अनुभवले गोदेचे रौद्ररूप

रामसेतूसह सिद्धपातळेश्वर, देवमामलेदार मंदिर, सिंहस्थ कुंभमेळा मंदिराला जलाभिषेक

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • गाडगे महाराज पुलाखालील टपऱ्या पाण्याखाली; सांडव्यावरची देवी मंदिराला पाण्याचा वेढा

  • नदीकाठ परिसरातील टपऱ्या, दुकाने हटविले; सराफ बाजाराच्या उंबरठ्यावर पुलाचे पाणी

  • रामकुंड, लक्ष्मणकुंड, सिताकुंड पाण्याखाली; शहरातील बहुतांश भागात पाणीच पाणी

नाशिक : शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. यंदाच्या मोसमातील गोदावरीला आलेला हा नववा पूर असला तरी, प्रथमच रामसेतूसह दुतोंड्या मारूती पाण्याखाली रविवार (दि.28) रोजी बुडाला. याशिवाय गोदावरी नदीपात्रातील सर्व छोटे-मोठे मंदीरे पाण्याखाली बुडाली आहेत. शहरासह त्र्यंबकेश्वर तसेच गंगापूर धरण परिसरात तुफान पाऊस कोसळत असल्याने, गंगापूर धरणातून सातत्याने विसर्ग वाढविण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतरही धरणांमधून सातत्याने विसर्ग वाढविला जात असल्याने नद्या, नाले तुडूंब भरून वाहत आहेत.

यंदा ७ मे पासून सुरू असलेल्या पावसाचा अजुूनही कहर सुरूच आहे. प्रारंभी अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यानंतर पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, सर्वच धरणे तुडूंब भरली. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू असला तरी, परतीच्या पावसाने देखील हाहाकार निर्माण केला आहे.

नाशिकला रविवार व सोमवार असा दोन दिवस आॅरेंज तर घाटमाथा परिसरात रेड अलर्ट दिल्याने, रविवारी (दि.२८) पावसाने कहर केल्याचे दिसून आले. शनिवारी रात्री ९ वाजेपासून सुरू असलेला कोसळधार पाऊस रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होता. याशिवाय गंगापूर धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने, धरणातून सातत्याने विसर्ग वाढविण्यात आला. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून १० हजार ९८८ क्यूसेस वेगाने पाणी गोदावरी पात्रात सोडविण्यात आले. त्यामुळे गोदावरीतील सर्व लहान मोठे मंदीरे पाण्याखाली गेली. रामकुंड, लक्ष्मण कुंड, सीताकुंडावरून गोदेचा वेगाने प्रवाह वाहत होता. याशिवाय सिद्धपातळेश्वर, देवमामलेदार मंदिर, सिंहस्थ कुंभमेळा मंदिरांसह नारोशंकरची घंटा पाण्याखाली गेली.

गोदेला आलेला महापूर बघण्यासाठी नाशिककरांनी गाडगे महाराज व होळकर पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गंगापूर धरणातून सातत्याने विसर्ग वाढविला जात असल्याने, महापालिका प्रशासनाने नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला. महापालिकेच्या सहाही विभागाकडून नागरिकांना सातत्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले जात होते.

महापुराचे मापदंड 'दुतोंड्या मारुती'

गोदावरी नदीच्या महापूराचे मापदंड म्हणून दुतोंड्या मोरुतीला ओळखले जाते. यापूर्वी २००८, २०१६ आणि २०१९ मध्ये आलेल्या महापूरामुळे दुतोंड्या मारुती बुढाला होता. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी दुतोंड्या मारुती पाण्याखाली बुडाला आहे. दरम्यान, जेव्हा दुताेंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली बुडतो, तेव्हा गोदेला महापुर येतो, असे बोलले जाते.

भांडीबाजारात पाणीच पाणी

२०१९ नंतर यंदा भांडीबाजारात पाणी शिरले. यावेळी व्यावसायिकांनी दुकानांमधील साहित्य हलविले. पाणी सराफ बाजारापर्यंत पोहोचल्याने, सराफ व्यावसायिकांची चिंता वाढली होती. व्यावसायिकांच्या मते, २०१९ नंतर महापालिका प्रशासनाने नदीपात्र खोल केल्याने, बाजारात पाणी शिरले नव्हते. मात्र, यंदा पाऊस जास्त असल्याने, पाणी बाजारात शिरले आहे. भाडीबारात सायंकाळी ६ वाजेपर्यंत गुडघाभर पाणी होते.

कपालेश्वर मंदिरासमोर पाणीच पाणी

कपालेश्वर मंदीर ते संत गाडगेबाबा पुलाकडे जाणारा मार्ग हा नेहमीच रहदारीचा असतो. पण रविवारी या ठिकाणी रस्त्याला नदीचे स्वरुप आल्याचे बघावयास मिळाले. यावेळी रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या दुकानांमधील साहित्य तत्काळ हटविण्यात आले. तसेच परिसरातील टपऱ्याही इतरत्र हलविल्या. या परिसरातील मुलांनी पाण्यात पोहोण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने त्यांना मज्जाव केला. नदीकाठ परिसरात प्रशासनाकडून गस्त घालण्यात आली.

रामतीर्थ गोदावरी समितीचा कंटनेर वाहून गेला

रामतीर्थ गोदावरी समितीचा गोदा घाटावर ठेवण्यात आलेला कंटेनर पुराच्या पाण्यात वाहून गेला. या कंटेनरमध्ये आरतीसाठी लागणारी विविध सामग्री होती. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका होता की, हा कंटेनरचा वाहून गेला. यावेळी उपस्थितांनी याबाबतचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला.

गोदावरीतून अकरा हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरु

नाशिक आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदेने रौद्ररूप घेतल्याचे दिसून आले. अकरा हजार क्यूसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने, गोदेच्या मोठे पात्र पाण्याने भरले होते. रविवार असल्याने, अनेक नाशिककर पुर बघण्यासाठी आले होते. विशेषत: सोमेश्वर धबधबा बघण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. याठिकाणी गोदावरीचे रौद्र रूप दिसून आले.

गंगापूर धरणातून असा वाढवला विसर्ग (दि.28 सप्टेंबर 2025)

  • पहाटे ४ वा. - ४,८८६ क्युसेस

  • सकाळी १०.३० वा. - ५,३२८ क्युसेस

  • सकाळी ११.३० वा. - ६,५१३ क्युसेस

  • दुपारी १.३० वा. - ८,६८६ क्युसेस

  • दुपारी २.१५ वा. - ९,८२८ क्युसेस

  • दुपारी ३.०८ वा. १०,९८८ क्युसेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT