Godavari Flood, Nashik : पावसाचा हाहाकार; गोदावरीला महापूर

आजही रेड अलर्ट : जिल्ह्यातील सर्वच धरणे 'ओव्हरफ्लो' झाल्याने, विसर्ग सुरू
नाशिक
नाशिक : शनिवार (दि.27) आणि रविवार (दि.28) दोन दिवस सुरु असलेला मुसळधार पाऊस व गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदामाईला महापूर आला आहे. (छाया: हेमंत घोरपडे)
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • २४ तासांमध्ये १२१.४ मिलिमीटर पाऊस नोंद; बागलाणमध्ये भिंत कोसळून तिघे ठार

  • इगतपुरी, त्र्यंबक, पेठला सर्वाधिक पाऊस; खरिपातील मका, कांद्यासह पिके भुईसपाट

  • निफाडमधील अनेक गावांचा संपर्क तुटला; कसारा घाटात दरड कोसळली

  • मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प; मालगाडीत बिघाड, रेल्व वाहतुकीवर परिणाम

The return rains have battered Nashik district

नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. शनिवार (दि. 27)पासून सुरू झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार उडाला. 24 तास झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीला महापूर आला. तर, जिल्ह्यातील सर्वच धरणे 'ओव्हरफ्लो' झाल्याने, विसर्ग सुरू आहे.

मोसम, गिरणासह सर्वच नद्या दुथडी वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. बागलाण तालुक्यात बोऱ्हाणे, खालची टेंभे गावात भिंत कोसळून सासरा-सुनेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. कसारा घाटात दरड कोसळल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. देवळाली-लहवित रेल्वेस्थनाकादरम्यान मालगाडीत बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. निफाड, येवला, चांदवड, दिंडोरीत ढगफुटीसदृश पावसाने थैमान घातले. यामुळे निफाडमधील काही गावांचा संपर्क तुटला. दोन दिवसांच्या अतिवृष्टीने खरिपातील कांदा, मका, द्राक्षांसह सर्वच पिके भुईसपाट झाली.

पेठसह येवला आणि सुरगाण्यात २४ तासांमध्ये अति मुसळधार पाऊस नोंदविला गेला. नाशिक, दिंडोरी, नांदगाव, सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, नाशिक शहरात शनिवारी सायंकाळी साडेपाच ते रविवारी सायंकाळी साडेपाच या २४ तासांत १२१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील २५ धरणांमधून एकाच वेळी पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. २४ तासांत ७२ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्यास तो अतिवृष्टी समजला जातो, तर २४ तासांत १०० मिमीहून अधिक पाऊस पडल्यास त्यास अतिमुसळधार समजले जाते. रविवारी (दि.21) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये पेठ तालुक्यात सर्वाधिक १४४.८ मिमी पाऊस नोंदविला गेला. येवल्यात ११६.४ मिमी, तर सुरगाण्यात १००.७ मिमी म्हणजे अतिमुसळधार पाऊस नोंदविला गेला. याशिवाय १४ मंडलांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. यात शेतातील पिके आडवी झाल्याने मोठी हानी झाली आहे.

जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

बागलाणमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसात घरांची पडझड होऊन तिघांचा मृत्यू झाला. टेंभे गावातील कस्तुराबाई भिका अहिरे (75) आणि गोराणे गावातील देवचंद गोपा सोनवणे (80) व त्यांची सून निर्मला नामदेव सोनवणे (30) यांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक
Godavari Flood : विसर्ग घटवला, गोदावरीची पूरस्थिती कायम, 'गंगापूर'मधून दोन हजार क्यूसेकने विसर्ग

21 नागरिक अडकले

अतिवृष्टीने झालेल्या या पावसात येवला तालुक्यातील अंदरसूल येथील कोळमाळ नदीच्या खालच्या बाजूस मळ्यात राहणारे 13 व्यक्ती अडकले. तसेच भारम गावात दोन वयोवृद्ध अडकले होते. नाशिक तालुक्यातील लाखलगाव गावात ताराबाई साळवे यांसह दोन गाई या गोदावरीच्या नदीपात्रात अडकल्या होत्या. त्र्यंबकेश्वरमध्ये सहा लोक पाण्यात अडकले होते. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

२४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिमी)

  • मालेगाव ६०.२

  • बागलाण ५६.९

  • कळवण ५५.७

  • नांदगाव ९१.२

  • सुरगाणा १००.७

  • नाशिक ७३.५

  • दिंडोरी ७७.६

  • इगतपुरी ६९.९

  • पेठ १४४.८

  • निफाड ६८.८

  • सिन्नर ७१.९

  • येवला ११६.४

  • चांदवड ६९.२

  • त्र्यंबकेश्वर ७६.७

  • देवळा ६८.८

नाशिक
Godavari River Flood | गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; गंगाखेड तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला

25 धरणांमधून विसर्ग

जिल्ह्यातील २६ पैकी २५ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून ८८ हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पालखेड येथून सर्वाधिक ३० हजार ४९८, करंजवणमधून १४ हजार ५७०, गंगापूर धरणातून १० हजार ९८८, दारणातून ९ हजार ५५२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातील होळकर पुलाखालून रात्री उशिरापर्यंत १८ हजार २३२ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरीला महापूर आला आहे. यामुळे शहरालगतचा परिसर पाण्यात गेला आहे.

धरणनिहाय विसर्ग स्थिती

  • कश्यपी १२८०

  • गंगापूर १०९८८

  • आळंदी ३५७१

  • भावली २०९३

  • वाकी ६३०

  • दारणा ९५५२

  • मुकणे १९५०

  • वालदेवी ८१४

  • कडवा ४२०४

  • वाघाड २८०४

  • पुणेगाव ३८४०

  • करंजवण १४५७०

  • ओझरखेड ४०५०

  • पालखेड ३०४९८

  • तिसगाव ३१०

जिल्ह्यात 'रेड अर्लट'

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यास सोमवारी (दि. 29) 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि पोलिसपाटील यांच्यापर्यंत सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

गडावर जाणाऱ्यांनी दक्षता घ्यावी

सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, सप्तश्रृंगगडावर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. गडावर गर्दीचे नियंत्रण होण्यासाठी प्रशासन आवश्यक उपाययोजना राबवित आहेत. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news