नाशिक : कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या संत आणि महंतांविषयी कोणीही वाकडे-तिकडे बोलल्यास सरकार खपवून घेणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिला. साधू आणि महंत गांजा ओढतात, त्यासाठी सरकार त्यांना पैसे देते, असे म्हणणे चूक आहे. जो कोणी असे बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, हा शहरी नक्षलवादाचाच प्रकार असून त्यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे, असे महाजन यांनी सांगितले.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री महाजन यांनी मंगळवारी (दि.१६) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर साधुसंतांवर टीकाटिप्पणी करणाऱ्यांना महाजन यांनी कठोर इशारा दिला. राज्यातील जनता ही महायुतीसोबत आहेत, आम्ही महायुतीने निवडून येऊ. तसेच विरोधी पक्ष कुठे राहणार नाही, ही लोकांची मानसिकता आहे.
काही जणांना मराठी माणसाचा आता कळवळा आलाय. परंतु, लोकांना माहिती आहे, लोक दुधखुळे नाहीत. मुंबई महानगरपालिकेचा निकाल आश्चर्यकारक लागेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. शिवसेनेसोबत आमची नैसर्गिक युती आहे. त्यामुळे घटक पक्षांसोबत चर्चा केली जाईल. विरोधकांना संधी देणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत जावे की नाही हा त्यांचा निर्णय असल्याचेही महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. मनसे आणि उबाठाच्या युतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठेही फरक पडणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील घडामोडींबाबत केलेल्या वक्तव्यात तथ्य नसल्याचा दावाही महाजन यांनी केला आहे. चव्हाण यांना दिवसा स्वप्न पडतात, असा टोलाही महाजन यांनी लगावला आहे.
युतीबाबत दोन दिवसांत निर्णय: नाशिक महापालिकेत युती म्हणून एकत्र लढण्याचे आमचे धोरण आहे. गेल्या निवडणुकीत आमचे ६७ नगरसेवक निवडून आले होते. तरीही युतीबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये तीन आमदार आमचे आहेत. त्यामुळे तिकीट मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना इतर जबाबदारी देऊ, मोठ्या भावाची भूमिका आमची आहे. आमचे आणि इतर पक्षातून आलेले असे शंभर नगरसेवक आमच्याकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेचे म्हणणे ऐकून निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.