

परभणी : महानगर पालिकेंतर्गत कार्यरत घंटागाडी वाहन चालक व सफाई कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे वेतन तसेच 16 महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) अद्याप न मिळाल्याने शहरातील घनकचरा संकलन व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. वेतन थकबाकीमुळे संतप्त कामगारांनी दि.6 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले, गेल्या दहा दिवसांपासून शहरातील घंटागाडी सेवा बंद आहे.
महानगरपालिकेने घनकचरा संकलनाचे काम शालीमार ट्रान्सपोर्ट या खासगी गुत्तेदारामार्फत दिलेले आहे. मात्र गुत्तेदाराकडून वेळेवर वेतन व पी.एफ.जमा न केल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. वेतनाबाबत विचारणा केली असता, महानगरपालिकेकडून थकीत बिले अदा झाल्यानंतरच पगार देण्यात येईल, असे गुत्तेदाराकडून सांगण्यात आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेने स्वतःची स्वतंत्र वाहने रस्त्यावर उतरवून कचरा संकलन सुरू केले आहे. मात्र, वेतन न देता स्वतंत्र वाहने लावणे म्हणजे आमच्या रोजगारावर घाला असल्याचा आरोप करत कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आमचा संपूर्ण उदरनिर्वाह याच कामावर अवलंबून आहे. पगार न देता काम हिरावून घेणे म्हणजे आमच्या पोटावर पाय मारण्यासारखे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कामगारांनी दिली. सर्व घंटागाडी वाहन चालक व सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत तात्काळ स्वतंत्र वाहने बंद करून थकीत वेतन व पी.एफ. अदा करण्याची मागणी केली आहे. मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे.
आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिका प्रशासन व गुत्तेदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप होत असून, प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.