Sanjay Raut Girish Mahajan  Pudhari
नाशिक

Girish Mahajan | तुमच्या बोलण्यामुळेच शिवसेनेचा ऱ्हास; आता नगरसेवकही राहणार नाहीत : गिरीश महाजन यांचा राऊतांवर पलटवार

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले

पुढारी वृत्तसेवा

Girish Mahajan Slams Sanjay Raut

नाशिक : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांचा मानसिक तोल बिघडला असून ते सातत्याने शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याची टीका महाजन यांनी केली.

महाजन म्हणाले की, "कालपर्यंत संजय राऊत आई-बहिणींवरून शिवीगाळ करत होते. त्यांचा तोल गेलेला आहे. ते कोणत्याही विषयावर काहीही बोलत आहेत. अशा प्रकारची भाषा राजकारणात शोभणारी नाही."

स्वतःच्या सुरक्षेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना महाजन यांनी स्पष्ट केले की, "मी रात्रंदिवस राज्यभर फिरत असतो. कुठेही संरक्षण घेऊन फिरत नाही. राज्यात मी एकमेव मंत्री नाही. माझ्यासोबत कोणताही विशेष बंदोबस्त नसतो."

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. "माझा ईडी किंवा सीबीआयसोबत काहीही संबंध नाही. संजय राऊत यांनी कधीही मला फोडून दाखवावे. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत," असे महाजन म्हणाले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा करताना महाजन म्हणाले, "तुमच्या बोलण्यामुळे शिवसेनेचा ऱ्हास होत चालला आहे. शिवसेना संपवायला जर एकच व्यक्ती कारणीभूत असेल, तर ते संजय राऊत आहेत. त्यांचा बॅलन्स बिघडला असल्यामुळे ते काहीही बोलत आहेत."

ठाकरे गटातील नेते आणि लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराचा उल्लेख करत त्यांनी राऊत यांच्यावर आणखी टीका केली. "त्यांचे आमदार गेले, खासदार गेले आणि येत्या काळात नगरसेवकही जातील. त्यांच्या मागे आता कोणीही उरलेले नाही. त्यांनी एकदा मागे वळून पाहावे, मग त्यांच्या मागे किती लोक आहेत हे त्यांनाच कळेल," असे महाजन म्हणाले.

जनता अशा प्रकारच्या भाषेला स्वीकारत नसल्याचे सांगताना त्यांनी म्हटले, "राज्यातील जनता सुज्ञ आहे. एवढ्या घाणेरड्या शिव्या कोणीही ऐकू शकत नाही. दंडेलशाहीची भाषा करून राजकारण होत नाही. आता त्यांच्या मागे अशा प्रकारचे राजकारण करणारे लोकही राहिलेले नाहीत."

राऊत यांनी आपल्या भाषाशैलीत बदल करण्याचा सल्ला देताना महाजन म्हणाले, "तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका. वाघाचे कातडे अंगावर घेण्याचा प्रयत्न करू नका. एखादा माणूस सतत शिवीगाळ करू लागला, काहीही बोलू लागला तर त्याने योगासने करायला हवीत. योगामुळे मानसिक संतुलन राखण्यास मदत होते आणि मन शांत राहते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT