Girish Mahajan  Pudhari Photo
नाशिक

Girish Mahajan | नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला! गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Girish Mahajan | महायुतीतील रस्सीखेच संपली; गिरीश महाजन नाशिकचे, तर भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा गेल्या काही काळापासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला असून, जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या नावावर पालकमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचाही तिढा निर्माण झाला.

रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राहिल्याने शिवसेनेकडून नाशिकच्या पालकमंत्रीपदाची मागणी करण्यात आली होती. परिणामी नाशिकचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरून पालकमंत्रीपदाचा मुद्दा वारंवार चर्चेत आला.

राष्ट्रीय सणांच्या पूर्वसंध्येला स्वतंत्र आदेश काढून गिरीश महाजन यांच्याकडे ध्वजारोहणाची जबाबदारी सोपवण्यात येत होती. त्यामुळे अधिकृत पालकमंत्री नसतानाही नाशिकचा अघो‌षित पालकमंत्री म्हणून महाजन यांच्याकडेच जिल्ह्याची जबाबदारी असल्याचे चित्र होते.

महाजन यांनीही या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर प्रशासनाच्या बैठका घेत सूचना केल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची जबाबदारीही त्यांच्याकडे असल्याने जिल्ह्यातील विकासकामांमध्ये त्यांचा सातत्याने हस्तक्षेप राहिला. दोन दिवसांपूर्वी स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पुस्तिकेवर पालकमंत्री म्हणून महाजन यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता.

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यांवरील पालकमंत्रीपदाचा तिढा आता सुटला आहे.

जिल्ह्याच्या विकासाला मिळणार गती

पालकमंत्रीपद रिक्त असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आणि विकासकामांसाठी निधीच्या मागणीवरही परिणाम झाला होता. आता गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपदाची अधिकृत जबाबदारी आल्याने जिल्हा नियोजनाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. सिंहस्थ कुंभमेळामंत्री म्हणून त्यांच्याकडे यापूर्वीच मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या विकासकामांसोबतच जिल्ह्यातील इतर विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT