नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने नाशिकच्या बाजारपेठेवरील मरगळ दूर झाली आहे. 'श्री'च्या प्रतिष्ठापनेनिमित्ताने शहरात २५० कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रिअल इस्टेट, सराफ बाजार, गणेशमूर्ती, मखर-सजावट साहित्य, फुले-फळे, मिठाई, पूजासाहित्य आणि विविध खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना गणेशोत्सवाने मोठी चालना दिली आहे. त्यामुळे 'बाप्पा पावला'चा प्रत्यय व्यापाऱ्यांवाला आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली होती. घरगुती गणपतीपासून सार्वजनिक मंडळांपर्यंत खरेदीचा उत्साह दिसून आला. सजावट क्षेत्रात यंदा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार केलेल्या कल्पक संकल्पनांना ग्राहकांची पसंती मिळाली. विविध थीमवर आधारित मखर, विद्युत रोषणाई, सजावटीच्या वस्तू आणि आकर्षक देखाव्यांसाठी मोठा खर्च करण्यात आला.
एआयच्या मदतीने मंदिरांच्या प्रतिकृती, पौराणिक देखावे, निसर्गरम्य रचना आणि आकर्षक मखरांना मागणी होती. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीच्या सजावटीसाठीही ग्राहकांनी साहित्य खरेदी केले. या क्षेत्रात १५ ते २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
गणरायाच्या पूजेसाठी फुले, हार, दुर्वा, पत्री तसेच सजावटीसाठी फुलांची मागणी वाढली. झेंडू, गुलाब, शेवंती यासह विविध फुलांच्या मागणीमुळे फुलबाजारात तेजी आली.
गणेशोत्सवाच्या कालावधीत ८ ते १० कोटी रुपयांची उलाढाल या क्षेत्रात झाल्याचा अंदाज आहे. गणपती आणि गौराईच्या नैवेद्यासाठी तसेच महाप्रसादासाठी लागणाऱ्या फळे व भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. मागणी वाढल्याने काही फळे व भाज्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. फळ-भाजीबाजारात गणेशोत्सवात १५ कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गणेशोत्सवात घराघरांत तसेच मंडळांकडून प्रसाद आणि मिठाईचे वाटप केले जाते. त्यामुळे मोदक, पेढे, लाडू, श्रीखंड, बासुंदीसह विविध मिठाईच्या मागणीत वाढ झाली. मिठाई विक्रीतूनही १० ते १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. पूजासाहित्य, धूप, अगरबत्ती, सजावटीची रोषणाई, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर पूरक वस्तूंच्या विक्रीलाही गणेशोत्सवामुळे चालना मिळाली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
गणरायासाठी सोने-चांदीचे दागिने, मुकुट, हार, मोदक, दुर्वाची पाने तसेच चांदीच्या मूर्तीच्या खरेदीला मागणी राहिली. गणेशोत्सवात सराफ बाजारात अंदाजे ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापारी क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. सोन्याच्या वाढलेल्या दरांचा परिणाम असतानाही श्रद्धेपोटी बाप्पासाठी दागिने खरेदी करण्याचा उत्साह कायम राहिला.
मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे रंग, पीओपी, थिनर, ब्रश तसेच इतर साहित्याच्या किमती वाढल्याने गणेशमूर्तींच्या दरात यंदा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यानंतरही आकर्षक, पर्यावरणपूरक आणि विविध आकारांच्या मूर्तींना मागणी कायम राहिली. घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विक्रीतून २० ते २५ कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज आहे.
गणेशोत्सवात घर खरेदी, नवीन घराचा ताबा आणि गृहप्रवेशाला शुभमुहूर्त मानला जात असल्याने रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठी उलाढाल वाढली. नवीन घर बुकिंग, सदनिका आणि भूखंड व्यवहारांना या कालावधीत चालना मिळाल्याने रिअल इस्टेटमध्ये १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहारांची शक्यता व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता विविध क्षेत्रांसाठी आर्थिक चक्राला गति देणारा ठरला आहे.