नाशिक : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना, निम्म्याहून अधिक मंडळांना महापालिकेची परवानगी मिळाली नसल्याने राज्य महोत्सवांतर्गत आयोजित स्पर्धेत सहभागापासून ही गणेश मंडळे वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे गणेश मंडळांमध्ये महापालिका प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटला आहे.
राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, राज्य, जिल्हा आणि तालुका या तीन पातळींवर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. २५ ऑगस्ट आहे.
स्पर्धेतील सहभागासाठी अवघे दोनच दिवस राहिलेले असताना, अद्यापपर्यंत शहरातील गणेश मंडळांना महापालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी महापालिकेत झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठकीत मनपा आयुक्तांनी एक खिडकी योजनेअंतर्गत विनाविलंब मंडळांना परवानगी देण्यासह मंडप शुल्क व जाहिरात कर न आकारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याबाबतही मनपा प्रशासनाकडून काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या महिनाभरापूर्वी अनेक मंडळांनी महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार परवानगीसाठी अर्ज केले होते. परंतु, अद्यापपर्यंत मनपाकडून परवानगी प्राप्त झालेल्या नाहीत. शनिवारी (दि. २३) सुटीचा दिवस असताना महापालिकेच्या कार्यालयात गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे ८५० रुपये भरल्याशिवाय मंडळांना परवानगी देण्यात येणार नाही. लवकरात लवकर पैसे भरा असे सांगण्यात आले. महापालिकेची परवानगी नसल्याने वीज वितरण कंपनीकडून वीज कनेक्शन मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मंडप शुल्क आकारणी फी माफ केली जात आहे. परंतु, यावर्षी अचानक नियम बदलल्याने पदाधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अर्ज केल्यापासून २४ तासांच्या आत परवानगी मिळावी, अशी गणेश मंडळांची मागणी होती. मात्र मंडळांना अद्याप परवानगी न मिळाल्याने देखावे उभारण्यासह वीज कनेक्शन तसेच राज्य महोत्सवांतर्गत राज्य शासनाने आयोजित केलेल्या स्पर्धेतदेखील सहभागी होण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.गणेश बर्वे, अध्यक्ष, श्री राजे छत्रपती कला क्रीडा मंडळ