

ठळक मुद्दे
महापालिकेकडून मंडप शुल्क, जाहिरात करमाफीसह परवानगी मिळत नसल्याने गणेश मंडळांचा आक्रमक पवित्रा
गणेश मंडळांकडून विविध स्वरूपाच्या करमुक्त जाहिराती घेतल्या जातात
परवानगी दिलेली नसल्याने गणेश मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेय
नाशिक : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना, महापालिकेकडून मंडप शुल्क, जाहिरात करमाफीसह परवानगी मिळत नसल्यामुळे शहरातील गणेश मंडळांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी (दि. २४) सायंकाळपर्यंत महापालिकेने शुल्क माफीसह मंडळांना परवानगी न दिल्यास शहरातील गणेश मंडळांकडून मंडप व आरास बंद ठेवून गणेशोत्सवावरच बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दिला आहे.
राज्यातील बहुतांश महापालिकांनी गणेश मंडळांना परवानगी देताना मंडप शुल्क माफ केले आहे. तसेच गणेशोत्सव काळात गणेश मंडळांकडून विविध स्वरूपाच्या जाहिराती घेतल्या जातात. त्यावर घेतला जाणारा कर माफ करण्यात आला आहे. त्या धर्तीवर नाशिक महापालिकेनेही मंडप शुल्क व जाहिरात कर माफ करावा, अशी मागणी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने महापालिकेकडे केली होती.
महापालिकेने यापूर्वीदेखील अशा प्रकारची शुल्क माफी मंडळांना दिली आहे. त्यामुळे यंदाही महापालिकेने मंडळांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. याशिवाय तीन वर्षे पूर्ण झालेल्या गणेश मंडळांना परवानगी देताना तत्काळ अंमलबजावणी केली जावी, अशीदेखील मागणी महामंडळांकडून करण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत मंडळांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिकेने घेतलेल्या बैठकीत आयुक्तांनी दोन दिवसांत शुल्क माफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रशासनाने काहीच भूमिका न घेता, उलट मंडळांना फोन करून शुल्क मागितले जात असल्याने मंडळांकडून नाराजी प्रकट केली जात आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत महापालिकेने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास शहरातील सर्व मंडळ गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करतील मात्र मंडप बंद ठेवले जातील. यासंदर्भात रविवारी सायंकाळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन पुढील दिशा ठरवली जाईल.
समीर शेटे, अध्यक्ष, नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या तातडीने द्याव्यात, तसेच जाहिरात कर व मंडप शुल्क माफ करून महापालिकेने मंडळांना दिलासा द्यावा, अशीही विनंती मंडळांनी केली. या मागणीस महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी प्रतिसाद देताना, अन्य महापालिकांकडून माहिती संकलित करून येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आगामी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महापालिका मुख्यालयात मंगळवारी (दि. १९) पार पडली. यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, राजेंद्र बागूल, रामसिंग बावरी, सुरेश दलोड, अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, उपायुक्त अजित निकत, सुवर्णा दखणे यांच्यासह पोलिस, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्याप एकाही गणेश मंडळाला महापालिकेकडून अधिकृत परवानगी मिळाली नसल्याची खंत व्यक्त करताना परवानगीअभावी देखावे उभारण्याची कामे रखडल्याची नाराजी महामंडळाचे अध्यक्ष शेटे यांनी व्यक्त केली. तीन वर्षे झालेल्या मंडळांना तत्काळ परवानगी देण्याचे तत्कालिन मुख्यमंत्र्यांचे आदेश असूनही प्रशासनाकडून सहकार्य केले जात नसल्याचेही शेटे यांनी सांगितले.
गणेश मंडळांना जाहिरात कर, मंडप शुल्क माफ करण्यात यावे, मंडळांच्या परिसरात मांसाहार विक्रीच्या दुकानांवर बंदी घालावी. गणेशोत्सव काळात दोन सत्रात स्वच्छता व्हावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत. मिरवणूक मार्ग स्वच्छ, अतिक्रमणमुक्त तसेच विद्युत तारांच्या अडथळ्यांपासून मुक्त व्हावा, बॅरेकेडींग करून रस्त्यांवर अधिक कोंडी केली जाऊ नये. मिरवणूक मार्गांवरील झाडाच्या फांद्यांची छाटणी करावी, पथदीप दुरूस्ती व्हावी, विसर्जनाच्या दिवशी गोदाघाटावर जीवरक्षक नेमावेत, आदी मागण्या यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.
यावर, रस्ते स्वच्छता, खड्डेमुक्तीची कामे तत्काळ केली जातील. मंडळांनी प्लास्टिक मुक्तीवर काम करावे. कचरा विलगीकरण करावे. सर्व मंडळांना परवानगी दिली जाईल. जाहिरात कर, मंडळ शुल्क माफीवर दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त खत्री स्पष्ट केले.
गजानन शेलार यांनी मंडळांच्या मागणीला समर्थन देताना, गणेशोत्सव काळात देखावे बघण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळावी. मिरवणुकीसाठी सलग दोन दिवस परवानगी द्यावी, रात्री १२ वाजता मिरवणूक संपवून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरवणूक सुरू करावी अथवा सर्व गणपती विसर्जित होईपर्यंत मिरवणूक सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अन्यथा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे गणेशोत्सवावर बहिष्कार टाकू, असा इशारा त्यांनी महामंडळाच्या वतीने दिला.
हिंदू जनजागृती समितीच्या राजश्री देशपांडे यांनी सूचना करताना काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते पत्ते-जुगार खेळतात, मद्यपान करतात, अशा अपप्रवृत्ती उत्सवातून दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत देशपांडे यांना रोखले. आमच्या गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पत्ते खेळत नाहीत, दारू पित नाहीत, असा दावा करत तसे होत असल्याचे दाखवून दिल्यास आम्ही पदाचा राजीनामा देऊ, असा खुलासा महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी केला.