त्र्यंबकेश्वर : श्री पंचायत बडा उदासीन आखाड्याने पाच साधू महंतांना आखाड्यातून आजीवन हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती आखाड्याचे श्रीमहंत दुर्गादास महाराज यांनी दिली आहे. तमिळनाडूतील कांचीपूरम येथे झालेल्या श्री पंचायत आखाडा बडा उदासी निर्वाण बैठकीत, आखाड्याशी संबंधित पाच संत आणि महंतांना आजीवन हद्दपार करण्याचा आणि त्यांचा हुक्का - पाणी बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
बुधवारी (दि. ८) श्री उदासी भेस भगवान आणि श्री पंचायत आखाडा बडा उदासीन निर्वाण यांची कांचीपूरम (तमिळनाडू) येथे बैठक झाली. बैठकीत उपस्थित संतांनी आखाड्याच्या संघटनेशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने श्रीमहंत रघुमुनी, स्थानिक महंत उग्रदास, जयेंद्र मुनी (कनखल), स्वामी शिवानंद (प्रयागराज), सेवादास (हरिद्वार) यांनी आखाडा आणि श्री सतपंच परमेश्वर यांच्या प्रतिष्ठा आणि हिताविरोधात न्यायालयासह इतर मंचांवर कारवाई केल्याचा आरोप आहे.
बैठकीत विचारमंथनानंतर वरील पाच व्यक्तींना श्री उदासी वेश भगवान आणि श्री पंचायत आखाडा बडा उदासी निर्वाणमधून हद्दपार करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
संघर्ष तीव्र होणार
महंत रघुमुनी यांना आखाडा परिषदेच्या दुसऱ्या गटाने बडा उदासीन आखाड्याचे प्रतिनिधी म्हणून घेतल्याचे नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे जाहीर केले होते. त्यावेळी अध्यक्ष निरंजनी आखाड्याचे श्री महंत रवींद्र पुरी महाराज आणि महामंत्री जुना आखाड्याचे श्री महंत हरिगिरी महाराज यांनी घोषणा करत मागच्या काही वर्षांपासून बडा उदासीन आखाड्यातून निश्काषित झालेले महंत रघुमुनी यांना व्यासपीठावर स्थान देऊन त्यांच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा होईल. तसेच त्यांच्या माध्यमातून बडा उदासीन आखाडा आमच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते.