MHADA Pudhari
नाशिक

Nashik - कल्पेश पाटील अटकेनंतर अधिकाऱ्यांमध्ये धास्ती

Nashik - कल्पेश पाटील अटकेनंतर अधिकाऱ्यांमध्ये धास्ती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सुमारे १५० कोटींच्या 'म्हाडा' घरकुल घोटाळ्याच्या तपासाची व्याप्ती आता मनपापर्यंत पोहोचल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांच्या अटकेनंतर मनपातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोमवारी मनपा मुख्यालयात शुकशुकाट दिसून आला.

या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू झाली असून, आता पोलिसांनी तपासाचा मोर्चा मनपाकडे वळविल्याचे चित्र आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानग्या मिळाल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाने १९७जणांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात महसूल, भूमी अभिलेख आणि मनपातील अधिकाऱ्यांची चौकशी आणि धरपकड सुरू असल्याने प्रशासनातील तणाव वाढला आहे.

नगररचना कल्पेश पाटील यांच्या अटकेनंतर विभागातील काही भूमी अभिलेख अधिकारी विभागाकडून प्राप्त कागदपत्रांच्या आधारेच परवानग्या देण्यात आल्याचा दावा करत आहेत. मात्र, पोलिस चौकशीची टांगती तलवार असल्याने अनेक अधिकारी मुख्यालयापासून दूर राहत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे अनेक अधिकाऱ्यांनी 'फिल्ड व्हिजिट'चे कारण पुढे करत मनपात येणे टाळल्याचे समोर आले असून, सोमवारी दिवसभर मनपा मुख्यालयात तुलनेने कमी वर्दळ दिसून आली. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT