कळवण : कळवण पुनदखोऱ्यातील रवळजी, मोकभणगी, देसराणे, खेडगाव, मानूर, ककाणेसह कळवण तालुक्यात कांदा लागवडीला चांगला वेग आला आहे. या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे कांदा लागवड सुरू केली असून, त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या भागात आहे.
दरवर्षी कांद्याची लागवड ही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबरमध्ये होत असत. परंतु अवकाळी पावसाने रोपांअभावी लागवड लांबणीवर गेल्याने चालू महिन्यात जानेवारीत लागवड करण्याची वेळ यंदा सर्वच शेतकऱ्यांवर आली आहे. एकाच वेळी लागवड असल्याने मोठ्या प्रमाणात मजुरांच्या टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. मजूरही अवाच्या सव्वा मजुरी घेत आहे. आधीच कमी भाव त्यात मजुरांची टंचाई यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे लागवडीला प्राधान्य दिले आहे.
या लागवडीसाठी जमीन रोटरने सपाट केलेली असावी लागते. यंत्रामध्ये रोपे ठेवण्यासाठी व रोप टाकण्यासाठी जागा केलेली आहे. मजुरांच्या साहाय्याने एक-एक रोप मशीनमध्ये टाकले जाते. रोप खाली जाऊन त्याला यंत्राद्वारे जमिनीत खोलवर घातले जाते. दिवसभरात साधारण एक एकर कांदा लागवड केली जाते.
गेल्या वर्षी मजूर टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा लागवड उशिराने झाली होती. यंदाही अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील रोपे वाया गेल्याने लागवड लांबणीवर पडली. दुसऱ्या टप्प्यात टाकलेली रोपे आता लागवडीसाठी आल्याने सर्वच शेतकरी मजुरांच्या शोधात होते. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांचा यंत्राद्वारे कांदा लागवड करण्याकडे कल वाढला आहे. सध्या या यंत्राने लागवड करण्यासाठी मोकभणगी, देसराणे परिसरात शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे.
यंत्राद्वारे कांदा लागवड केल्यास शेती मशागती व मजुरीचा खर्च वाचतो. या यंत्राद्वारेच बेड पाडले जातात. एकरी दोन ते अडीच लाख कांदा रोपे लागतात. रोपांमधील अंतर एकसारखे असल्याने हवा खेळती राहते. कांदे एकसारखे आकाराचे निघतात. उत्पादनातही वाढ होते. एकंदरीत वेळेची व पैशांची मोठी बचत होते.मधुकर पगार, शेतकरी, कळवण
जमिनीच्या सर्व भागांतसारखी लागवड होते. वाफे तयार करावे लागत नाहीत. सर्वत्र सारखेच कांदे लागतात. तसेच उत्पादनातही निश्चित वाढ होते.राहुल पवार, यंत्रमालक, मानूर