लासलगाव :संपूर्ण जिल्ह्यात मांजा वापरावर बंदी असतानाही मकरसंक्रांतीच्या दिवशी लासलगाव-विंचूर रस्त्यावर मांजामुळे गंभीर घटना घडली. विंचूर येथून लासलगावकडे मोटारसायकलने येत असताना विंचूर स्मशानभूमी परिसरात मांजाचा दोरा गळ्याला अडकल्याने एका शेतकऱ्याच्या गळ्याला खोल जखम झाली.
राजेंद्र वाजे (रा. विंचूर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, अचानक गळ्याभोवती मांजा अडकल्याने त्यांच्या गळ्याला मोठी चीर पडली. रक्तस्राव होत असतानाही त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ विंचूर येथील डॉ. संदीप पाटील यांच्या दवाखान्यात उपचार घेतले. जखमेवर टाके घालण्यात आले असून, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
या घटनेमुळे मांजा वापरावर बंदी असूनही अशा घटना कशा घडतात, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लासलगाव पोलिस अलर्ट मोडवर असल्याचे सांगितले जात असताना, खुलेआम मांजा वापरला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.