Akole Snake Bite Cases Pudhari
नाशिक

Snake Bite Death | प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर! उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या 55 वर्षीय शेतकऱ्याचा तडफडून मृत्यू

Snake Bite Death | सिद्ध पिंप्री आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

नाशिक तालुक्यातील सिद्ध पिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन केले आहे.

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहता जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ डॉ. अभिजित गोखले यांच्याकडे सिद्ध पिंप्री केंद्राची जबाबदारी सोपविली असून, सोमवार (दि. २८) पासून प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील यांना पाठवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्ध पिंप्री येथील शेतकरी विजय ढिकले (५५) हे शुक्रवारी (दि. २५) मध्यरात्री १ च्या सुमारास आपल्या शेतात पाणी भरत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. काही वेळातच त्यांना असह्य वेदना सुरू झाल्या.

कुटुंबीयांनी तातडीने त्यांना सिद्ध पिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव अहिरे आणि प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम नाईकवडी हे दोघेही हजर नव्हते. तसेच केंद्राची रुग्णवाहिकाही जागेवर नव्हती. त्यामुळे विजय ढिकले यांना कोणताही प्राथमिक उपचार मिळू शकला नाही.

नाईलाजाने कुटुंबीयांनी खाजगी वाहनाने त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेले. तिथून त्यांना नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यास सांगण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शनिवारी (दि. २६) सकाळी १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मृदुला नाईक तसेच जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. हर्षल नेहाते (जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी) व डॉ. हर्षल महाजन (तालुका आरोग्य अधिकारी) हे दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून चौकशी अहवाल तयार करून ग्रामस्थांसमोर वाचून दाखवला.

ग्रामस्थ अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, शंकरराव ढिकले, जयराम ढिकले, अंबादास ढिकले, यशवंतराव ढिकले, हरिभाऊ ढिकले, नामदेव ढिकले आदींनी डॉ. नेहाते यांना निवेदन दिले. विजय ढिकले यांना तीन मुली व मुलगा असून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती.
शासकीय अनास्थेने आमच्या कुटुंबाचा आधार हिरावला, शासनाने नैतिक जबाबदारी स्वीकारून कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

चौकशीदरम्यान अनेक त्रुटी:

  • रक्त - लघवी तपासणी यंत्र बंद अवस्थेत.

  • रुग्णांना रिपोर्ट उशिरा मिळत असल्याची तक्रार.

  • सर्पदंशावरील लस केंद्रात उपलब्ध असूनही डॉक्टर नसल्याने वापर नाही.

अधिकारी प्रतिक्रिया:"चौकशी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवला आहे. वरिष्ठ स्तरावरून दोषींवर कारवाई केली जाईल."
- डॉ. हर्षल नेहाते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT