नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दैवीशक्ती आणि अघोरी पूजाविधीच्या नावाखाली पैशांचा पाऊस पाडून रातोरात श्रीमंत करण्याचे आमिष दाखवणारा भोंदू अरुण धोंडू पाटील अद्यापही फरार आहे. त्याला तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी अनिस पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली.
सोमवारी (दि. १९) गंगापूर पोलिस ठाण्यात भोंदू पाटील याच्याविरोधात जादुटोनाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. पनवेल येथील आजाराने ग्रस्त महिलेची दैवीशक्तीने आजार बरा करण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केल्याचा पाटील याच्यावर आरोप आहे.
दरम्यान, अनिस पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत यास अटक करण्याची मागणी केली. पाटील याचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत असल्याने त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
भोंदू पाटील याचे साथीदार पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यात एका मोठ्या राजकीय पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचा पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर आहे. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तो अरुण पाटीलचा साथीदार असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
फरार भोंदू अरुण पाटील याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत, माझ्यावर गुन्हा खोटा दाखल झाल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओत पाटील याने, मी भोंदू नसून जमीन खरेदी-विक्री करणारा व्यावसायिक असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याचा हा व्हिडिओ म्हणजे पोलिसांना आव्हान असल्याची चर्चा रंगत आहे.
भोंदू पाटील याने मंचरच्या दाम्पत्याला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांना फसवल्याचे पुढे येत आहे. संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाटील याने काही रक्कम परत केल्याची माहिती आहे. मात्र, उर्वरित रक्कम परत करण्यास तो टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदार महिलेचा आहे.