नाशिक : भारताचे आर्थिक चित्र जनरेशन झेड पिढीमुळे झपाट्याने बदलत आहे. ही पिढी संपत्ती निर्मितीच्या पारंपरिक पद्धती बदलून अधिक पारदर्शक, लवचिक आणि खर्चिकदृष्ट्या परिणामकारक मार्ग निवडत चालली आहे. इटीएफचे कमी खर्चाचे मॉडेल अधिक परतावा आणि संपत्ती निर्माण करत असल्याने तरुणांकडून ईटीएफला जोरदार पसंती मिळालवी आहे.
जनरेशन झेड म्हणजे डिजिटल जगात वाढलेली सध्याची माहितीप्रेमी तरुण पिढी होय. पारंपरिक, शुल्कआधारित गुंतवणूक साधनांऐवजी एक्सचेंज ट्रेडेड फंडांला (इटीएफ) या पिढीने प्राधान्य दिल्याने शेअरबाजारातील गुंतवणूक प्रचंड वाढली आहे. भारताच्या आर्थिक विकासाने गती पकडली आहे. बाजारात 2024-25 मध्ये विक्रमी आयपीओ आणि ६ ते ७ टक्के वार्षिक जीडीपी वाढीच्या अपेक्षांमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. अशा स्थितीत जनरेशन झेडची भूमिका ठळक झाली आहे. ही पिढी डिजिटल साक्षर, आर्थिकदृष्ट्या जागरूक आहे, परंतु आपल्या प्रत्येक रुपयाच्या मूल्यासाठी जागरूक आहे.
पारंपरिक म्युच्युअल फंड लोकप्रिय असले तरी, त्यात व्यवस्थापन शुल्क व अन्य खर्च लपलेले असतात. इटीएफ तुलनेत कमी खर्चिक पर्याय आहेत. ईटीएफ फंडांची रचना जनरेशन झेडच्या अपेक्षांशी जुळते. त्यांचे खर्च गुणोत्तर खूपच कमी असते आणि त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत जास्त परताव्याची शक्यता असते. विशेषतः तरुण गुंतवणूकदारांसाठी पारदर्शकता आणि लवचिकता हाही मोठा मुद्दा आहे. ईटीएफ फंड शेअर बाजारात नोंदणीकृत असल्याने गुंतवणूकदारांना खरेदी-विक्री करता येते. इटीएफमध्ये अनेक शेअर्स, बाँड्स समाविष्ट असल्याने विविधता मिळते आणि जोखीम व्यवस्थापनही सोपे होते.
भारतातील डिजिटल क्रांतीमुळे शेअर बाजारातील प्रवेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे. स्मार्टफोन, फिनटेक प्लॅटफॉर्म्सचा विकास आणि डिजिटल मंच यामुळे गुंतवणूक खूप सोपी झाली आहे. जनरेशन झेड या ॲपआधारित जगात वाढल्याने त्यांना हाताळण्यास सुलभ गुंतवणूक उत्पादने हवी असतात.
जगभरात इटीएफची लोकप्रियता वाढत आहे. व्हॅनगार्ड एफटीएसई इमर्जिंग मार्केट्स ईटीएफ (व्हीडब्ल्यूओ) मध्ये भारताचा हिस्सा 20 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे आणि तो पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट आहे. यातून भारताची वाढती आर्थिक विश्वासार्हता आणि भारतीय गुंतवणूकदारांची प्रगल्भता प्रतिबिंबित होते.
इटीएफचे कमी खर्चाचे मॉडेल गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा जास्त ठेवण्यास आणि त्यातून संपत्ती निर्माण करण्यास मदत करते. गेल्या दशकात, ईटीएफने सरासरी 7 ते 10 टक्के वार्षिक परताव्याचे स्तर गाठले आहेत आणि ते प्रमुख शेअर निर्देशांकांच्या कामगिरीशी मिळतेजुळते आहेत. 2007 ते 2024 या कालावधीत ईटीएफने सुमारे दोन-तृतीयांश महिन्यांमध्ये सकारात्मक परतावा दिला आहे. परंतु भारतातील भांडवली नफ्यावर करआकारणी हे ईटीएफसमोरील प्रमुख आव्हान आहे. प्रतिवर्षी नफ्यावर 12.5 टक्के कर द्यावा लागतो. त्यामुळे निव्वळ परताव्यावर परिणाम होऊ शकतो.
ॲम्फीच्या आकडेवारीनुसार विविध प्रकारच्या ईटीएफ फंडात ३१ मे २०२५ अखेर गुंतवणूकदारांचा निधी तब्बल १२ लाख २४ हजार २४४ कोटी रुपयांवर पोहचला आहे. त्यात मे महिन्यात २८ हजार ५२० कोटी रुपयांच्या निधीचे संकलन झाले आहे. ईटीएफमध्ये सध्या ६२९ वेगवेगळ्या योजना असून सुमारे सव्वा चार लाख फोलिओ सक्रीय आहेत.